जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे डोके फोडल्याचा आरोप करत अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
नीट पेपरफुटीप्रकरणाविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हिंसक कारवाईवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. “२० हून अधिक विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात प्रश्न विचारणाऱ्या निष्पाप मुलांवर लाठ्या चालवताना आणि बंदुका दाखवताना सरकारला लाजा वाटल्या पाहिजेत,” अशी थेट टीका त्यांनी केली.
अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, देशात लोकशाही उरली नसून निव्वळ दडपशाही सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची रास्त मागणी करणाऱ्या महिला आंदोलकांवर पुरुष पोलिसांनी लाठीमार केला, तर नाव-बॅज नसलेल्या जवानांनी तरुणांना बेशुद्ध होईपर्यंत तुडवले. पेपर फोडून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करणारे मोकाट फिरत आहेत आणि हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांची डोकी फोडली जात आहेत. स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत नसल्यानेच सरकारने हा अमानुष पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.




