Nanded Crime : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ‘गुरुजीं’चा अत्यंत टोकाचा निर्णय; दोन निष्पाप मुलांसह कार गोदावरीत झोकली!

spot_img

आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर लिहिलं ‘मरणोत्तर’ सत्य; नांदेडमध्ये शिक्षण विभागातील चौघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

समाजाला सुजाण नागरिक देण्याची आणि नवी पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र, याच व्यवस्थेतील अंतर्गत मानसिक छळाला कंटाळून एका ४२ वर्षीय कर्तव्यदक्ष शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह आयुष्य संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे. सुनील मोरे असे या मृत शिक्षकाचे नाव असून, त्यांनी आपल्या मुलांसह कार थेट गोदावरी नदीच्या पात्रात वेगाने झोकून देऊन जलसमाधी घेतली. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर आपल्या वेदना मांडत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या मृत्यूपूर्व दाव्याच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी शिक्षण विभागातील तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांसह चौघांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असलेले सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील ‘पोटा बुद्रुक’ येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. आपल्या दोन्ही मुलांना (मुलगी सारा आणि मुलगा सुमित) शाळेत सोडतो असे सांगून ते कार घेऊन घरातून बाहेर पडले. मात्र, मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावर पोहोचताच त्यांनी कार थेट गोदावरीच्या नदीपात्रात टाकली. या भीषण घटनेत सुनील मोरे यांच्यासह त्यांच्या दोन्ही सोन्यासारख्या लेकरांचा जागीच बुडून अंत झाला.

नदीत कार टाकण्यापूर्वी पहाटे ५:५४ च्या सुमारास सुनील मोरे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर एक धक्कादायक स्टेटस ठेवले होते. “मला माफ करा, मी माझ्या मुलाबाळांसह आत्महत्या करत आहे…” अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली होती. मयत सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशीला हे दोघे २०२३ ते २०२५ या कालावधीत हदगाव येथील भानेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. या काळात तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांनी लावलेल्या एका प्रशासकीय चौकशीच्या नावाखाली मोरे यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला.

सुनील मोरे यांचे वडील नारायण मोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि मयत मोरे यांचे सहकारी दत्ता पवळे यांनी त्यांचा सतत अपमान केला आणि मानसिक छळ केला. बदली झाल्यानंतरही हा त्रास सुरूच राहिल्याने अखेर या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. वडिलांच्या तक्रारीवरून नांदेड पोलिसांनी या चारही आरोपींविरुद्ध मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ