Thiruvananthapuram-Delhi Rajdhani Express : राजधानी एक्सप्रेसमध्ये भीषण आग; रेल्वे वाहतूक काही तास विस्कळीत

spot_img

तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्य प्रदेशातील विक्रमगड आलोट आणि लुनीरिच्छा स्थानकांदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. पहाटे सुमारे सव्वा पाचच्या सुमारास ट्रेनच्या बी-1 एसी डब्यात अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. या डब्याच्या मागील सामान व गार्ड व्हॅनलाही आग लागल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

गार्डने वेळीच परिस्थिती ओळखत लोको पायलटला सतर्क केले. त्यानंतर तातडीने ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित डब्यात तब्बल 68 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अवघ्या 15 मिनिटांत संपूर्ण डबा रिकामा करण्यात आला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आग इतकी तीव्र होती की काही मिनिटांतच तिने संपूर्ण डबा वेढला. सामान ठेवलेल्या डब्यातील अनेक प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले. घटनेनंतर मदत आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या दुर्घटनेमुळे दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. अपघातग्रस्त डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला असून उर्वरित प्रवाशांना इतर डब्यांत हलवण्यात आले. सुमारे चार तास उशिराने राजधानी एक्सप्रेस कोटाकडे रवाना झाली. दरम्यान, या घटनेमुळे इतर काही गाड्यांच्याही वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ