जुने नाव ठरत होते दिशाभूल करणारे; आता ‘पीएमओएस’ (PMOS) नावाने होणार ओळख, केवळ गर्भाशयाच्या गाठी नव्हे तर संपूर्ण शरीरावर होतो परिणाम.
आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये थायरॉईड, PCOD आणि PCOS यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. अगदी लहान मुलींनाही या आजारांचा सामना करावा लागत आहे. यापैकी अत्यंत सामान्य असलेल्या ‘PCOS’ या आजाराचे नाव आता अधिकृतपणे बदलून ‘पीएमओएस’ (PMOS – पॉलीएंडोक्राइन मेटाबोलिक ओव्हेरियन सिंड्रोम) असे करण्यात आले आहे. डॉक्टर आणि संशोधकांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला, कारण जुने नाव बऱ्याच अंशी दिशाभूल करणारे ठरत होते आणि त्यामुळे अनेक महिला योग्य उपचार घेण्यास उशीर करत होत्या.
‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ या जुन्या नावामुळे फक्त अंडाशयातील गाठींवर लक्ष केंद्रित होत होते. परंतु, प्रत्यक्षात या समस्येचा सामना करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या अंडाशयात गाठी असतातच असे नाही. सोनोग्राफी किंवा स्कॅनमध्ये दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या गाठी नसून, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वाढ खुंटलेली ‘फॉलिकल्स’ असतात. या फॉलिकल्सवर कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसते. तज्ज्ञांच्या मते, हा केवळ प्रजननाशी संबंधित आजार नसून, याचा थेट संबंध शरीराच्या चयापचय (Metabolism) आणि संपूर्ण हार्मोनल सिस्टीमशी आहे. यामुळे वजन वाढणे, इन्सुलिन प्रतिरोध, टाईप-२ मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक नैराश्याचा धोका वाढतो.
नवीन नावातील ‘पॉलीएंडोक्राइन’ म्हणजे शरीरातील इन्सुलिन आणि टेस्टोस्टेरॉनसह अनेक हार्मोन्सवर होणारा परिणाम; ‘मेटाबोलिक’ म्हणजेच चयापचय क्रियेचा वजनाशी असलेला संबंध; ‘ओव्हेरियन’ म्हणजे अंडाशयाची बिघडलेली कार्यप्रणाली आणि ‘सिंड्रोम’ कारण याची लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी असतात. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढल्याने टेस्टोस्टेरॉन (पुरुष संप्रेरक) जास्त तयार होते, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर नको असलेले केस येणे, केस गळणे, पुरळ उठणे आणि वजन वाढणे अशी लक्षणे दिसतात. जरी या आजाराचे नाव बदलले असले, तरी यावरील मुख्य उपचार पद्धती ही जीवनशैली सुधारण्यावरच अवलंबून आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्ती याद्वारे यावर नियंत्रण मिळवता येते. मात्र, कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.




