आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील घटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिसरे आणि चौथे अपत्य जन्माला घालणाऱ्या पालकांसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसण्णपेटा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील जन्मदर सातत्याने कमी होत असल्याने भविष्यात लोकसंख्येचा समतोल बिघडू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या नव्या योजनेनुसार, तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पालकांना 30 हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा विशेष भत्ता दिला जाईल. यापूर्वी दुसऱ्या अपत्यासाठीही 25 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा विचार सरकारने मांडला होता. या संपूर्ण योजनेचे नियम, अटी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया पुढील महिन्यात जाहीर होणार असल्याची माहितीही नायडू यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाजूने भूमिका घेणारे नायडू आता वाढत्या वयोवृद्ध लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक आव्हानांबाबत चिंता व्यक्त करत आहेत. बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण आणि छोट्या कुटुंबांचा वाढता कल यामुळे अनेक जोडपी एकाच अपत्यावर समाधान मानत असल्याचे त्यांनी सांगितले. काही कुटुंबे पहिली मुलगी असल्यासच दुसऱ्या अपत्याचा विचार करतात, त्यामुळे जन्मदर घटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याचा एकूण प्रजनन दर 2.1 कायम राखणे अत्यावश्यक असल्याचे नायडू म्हणाले. हा दर कमी झाल्यास भविष्यात कामगारांची संख्या घटू शकते आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोकसंख्या संतुलित ठेवण्यासाठी समाजाने सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




