Supriya Sule : शिंदेंच्या दालनातील ‘त्या’ गुप्त बैठकीवर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा; राऊतांच्या नाराजीवर पडदा टाकत ठाकरेंना करून दिली ‘ती’ आठवण!

spot_img

“तो केवळ एक योगायोग होता”; मविआतील बिघाडीच्या चर्चांवर राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका स्पष्ट

विधानभवनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतलेल्या आमदारांच्या बैठकीवरून महाविकास आघाडीत (MVA) मोठे वादळ निर्माण झाले होते. “थेट गद्दार आणि विश्वासघाताने सरकार पाडणाऱ्याच्या दालनात शरद पवारांनी बैठक घेणे जिव्हारी लागले,” अशा तिखट शब्दांत शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या भेटीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘एनडीए’ (NDA) किंवा महायुतीशी घरोबा वाढतोय की काय, अशा चर्चांना उधाण आले होते. या सर्व वादावर आणि मविआतील संभाव्य बिघाडीच्या संकेतांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत चतुरपणे पक्षाची अधिकृत भूमिका मांडत पडदा टाकला आहे.

संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तिथे कोणतीही पूर्वनियोजित राजकीय बैठक नव्हती. शरद पवार हे एका शासकीय बैठकीसाठी विधानभवनात गेले होते. तेथून चालत येत असताना काही आमदारांना त्यांच्याशी तातडीने संवाद साधायचा होता. विधानभवनात कोणाचेही दालन कायमस्वरूपी फिक्स नसते. त्या वेळी तिथे सर्वात जवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केबिन होते. केवळ सोयीचा भाग म्हणून आमदार शरद पवारांना घेऊन त्या केबिनमध्ये गेले आणि त्यांच्यात गाठीभेटी झाल्या. हा निव्वळ एक योगायोग आणि अत्यंत सहज घडलेली घटना होती.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, या वादाची बातमी झाल्यानंतर त्यांनी स्वतः संजय राऊत यांना फोन केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या “मी कालच संजय राऊत यांच्याशी फोनवर बोलून संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट केला आहे. कुणीतरी त्यांना चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली असेल, ज्यामुळे गैरसमजातून ते असे बोलले असावेत. ही घटना इतकी साधी होती की त्याची एवढी मोठी राजकीय बातमी होईल, याचे मलाही आश्चर्य वाटले. कदाचित माहितीअभावी राऊत दुखावले गेले असतील, पण संवादानंतर आता हा विषय संपला आहे.”

या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी भूतकाळातील एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा दाखला देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सूचक टोलाही लगावला. त्यांनी आठवण करून दिली की, ज्या वेळी अजित पवार (अजितदादा) हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून महायुती आणि ‘एनडीए’सोबत गेले, त्याच्या अवघ्या १७ व्या दिवशी स्वतः उद्धव ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांसह अजितदादांना भेटायला गेले होते.

उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री हे एक संवैधानिक पद आहे. त्यामुळे एका घटनात्मक पदावरील व्यक्तीला सदिच्छा भेट देणे किंवा शुभेच्छा देणे यात काहीही गैर नाही. त्यावेळी आम्ही ही बाब अत्यंत सकारात्मकतेने आणि मोठ्या मनाने समजून घेतली होती, असे स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी राजकारणात सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे गैर नसल्याचे ठामपणे सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ