Kolhapur Crime : “विषय संपवला!” कोल्हापुरात भररस्त्यात पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या; ८ वर्षांच्या प्रेमविवाहाचा संशयातून रक्तरंजित थरार

spot_img

पेठवडगाव येथील धक्कादायक घटना; भरपावसात वकिलांच्या ऑफिसबाहेर पतीने केला सपासप वार, आरोपी पती अद्याप फरार

चारित्र्यावरील संशयाचे भूत डोक्यात संचारल्यामुळे एका पतीने आपल्याच पत्नीची भररस्त्यात आणि भरपावसात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे घडली आहे. आठ वर्षांपूर्वी अत्यंत प्रेमाने संसार थाटलेल्या या दाम्पत्याच्या वादाचा अंत एवढा भयंकर होईल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण पेठवडगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात घडलेल्या या गुन्हेगारी प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे मृत दुर्दैवी महिलेचे नाव असून, आरोपी पती दीपक कांबळे (वय ३५) हा हत्येनंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे. या दाम्पत्याला दोन निष्पाप मुली आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून दीपक हा पत्नी अमृताच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता, ज्यामुळे त्यांच्या घरात रोज तीव्र भांडणे होत असत. या कौटुंबिक जाचाला कंटाळून अमृता या कायदेशीर सल्ल्यासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पेठवडगाव एसटी स्थानकाच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

अमृता वकिलांच्या ऑफिसबाहेर पोहोचताच, मागावर असलेल्या दीपकने त्यांना गाठले. दोघांमध्ये तिथेच जोरदार वाद सुरू झाला. संतापाचा पारा चढलेल्या दीपकने अचानक स्वतः जवळील धारदार कोयता काढला आणि अमृता यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा थरार पाहून परिसरातील काही धाडसी तरुणांनी दीपकला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधम दीपकने त्यांना दमदाटी करत, “ती माझी पत्नी आहे, तुम्ही या भानगडीत पडू नका,” असे ओरडून पुन्हा वार केले. अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर, “विषय संपवला!” असे थंड डोक्याने म्हणत आरोपी तिथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसातच पसार झाला.

गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरख चौधरी आणि उपनिरीक्षक प्रियांका खाडे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पथकाच्या मदतीने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने व इतर पुरावे गोळा केले आहेत. अमृता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, फरार संशयित आरोपी पती दीपक कांबळे याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत शोधमोहीम तीव्र केली आहे. संशयाच्या अतिरेकामुळे दोन चिमुरड्या मुलींच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र एका झटक्यात हरपले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ