सुरक्षा यंत्रणेच्या ‘स्मार्ट लॉक’ने उघड केले सॉफ्टवेअर इंजिनीअरचे पाप; भारतात सुरू असलेल्या विवाहबाह्य संबंधातून पत्नीचा काटा काढल्याचा पोलिसांचा दावा
देशात सध्या सोनम रघुवंशी आणि सिया गोयल यांच्या क्रूर कृत्यांची चर्चा सुरू असतानाच, आता सातासमुद्रापार अमेरिकेतून एका भारतीय इंजिनीअरच्या भयानक कृत्याने संपूर्ण जग हादरले आहे. अमेरिकेत राहून काम करणाऱ्या एका ३० वर्षांच्या भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअरवर स्वतःच्याच पत्नीची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मूळचा तेलंगणचा असलेला अविनाश नार्णे याने ऑक्टोबर २०२५ मध्ये वॉशिंग्टन येथील बेलेव्ह्यू येथील आपल्या राहत्या घरी पत्नी राजिता सबिनेनी हिचा खून केला होता. सुरुवातीला हा अपघात किंवा अज्ञात व्यक्तीचे कृत्य भासवण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु जवळपास ९ महिने चाललेल्या सखोल तांत्रिक आणि डिजिटल तपासानंतर पोलिसांनी अविनाशला अटक करून त्याच्यावर हत्येचा ठपका ठेवला आहे.
तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, अविनाशचे भारतात एका दुसऱ्या महिलेसोबत गुप्त प्रेमसंबंध होते आणि याच विवाहबाह्य संबंधातून त्याने पत्नीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीचा खून केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने तिच्या मृतदेहाचा फोटो भारतातील आपल्या प्रेयसीला पाठवला होता, अशी कबुली खुद्द आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे. अविनाश सध्या अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत असून, गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
ऑक्टोबर २०२५ मध्ये आरोपी अविनाशने स्वतः बेलेव्ह्यू पोलिसांना फोन करून एक बनाव रचला होता. “माझी पत्नी बाथरूममध्ये अडकली असून आतून कोणताही प्रतिसाद देत नाहीये,” अशी माहिती त्याने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाथरूमचा दरवाजा तोडला, तेव्हा राजिता ही जमिनीवर मृत अवस्थेत आढळली. या जोडप्याच्या लग्नाला त्यावेळी अवघे ६ महिनेही पूर्ण झाले नव्हते. सुरुवातीला संशयास्पद वाटणाऱ्या या मृत्यूचा जेव्हा पोस्ट मॉर्टम (Post Mortem) रिपोर्ट आला, तेव्हा राजिताचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि या प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले.
अविनाशने पोलिसांना सांगितले होते की, तो ४० मिनिटांसाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेला होता आणि परत आल्यावर त्याला पत्नी बाथरूममध्ये बंद आढळली. मात्र, पोलिसांनी अपार्टमेंटच्या मुख्य दरवाजावरील ‘स्मार्ट लॉक’ (Smart Lock) आणि सुरक्षा सिस्टीमच्या डिजिटल डेटाची तपासणी केली तेव्हा त्याचे बिंग फुटले:
अविनाश काही काळासाठी बाहेर गेला होता हे खरे असले, तरी तो बाहेर असताना घराचा दरवाजा उघडून इतर कोणतीही अज्ञात व्यक्ती आत घुसली नसल्याचे ‘स्मार्ट लॉक’च्या रेकॉर्डवरून सिद्ध झाले. म्हणजेच, तिसऱ्या व्यक्तीने आत येऊन हत्या करण्याची शक्यता पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावली.
लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही अविनाशचे भारतातील त्या महिलेशी संबंध होते. विशेष म्हणजे, ती प्रेयसी या जोडप्याच्या लग्नालाही हजर होती. ज्या दिवशी राजिताचा मृत्यू झाला, त्या दिवशी अविनाशने आपल्या प्रेयसीला किमान ४ वेळा फोन केला होता. अगदी पत्नी बाथरूममध्ये अडकल्याचे भासवून दरवाजा तोडण्याचा नाटक करत असतानाही त्याचे प्रेयसीशी फोनवर बोलणे सुरू होते.
अविनाशच्या फोन रेकॉर्ड्स, मेसेज आणि इंटरनेट ब्राउझिंग हिस्टरीवरून पोलिसांनी हत्येचा संपूर्ण कट उलगडला आहे. लग्नानंतरही प्रेयसीच्या प्रेमात वेडा असलेल्या अविनाशने राजिताचा काटा काढण्याचे ठरवले. पत्नीचा जीव घेतल्यानंतर तिचा मृतदेह बाथरूममध्ये टाकून तो बाहेर गेला, जेणेकरून सीसीटीव्ही आणि डिजिटल लॉकवर त्याची बाहेर जाण्याची नोंद व्हावी. मात्र, घरात दुसरी कोणतीही एन्ट्री (Entry) न झाल्याने गुन्हेगार दुसरा कोणी नसून पतीच असल्याचे स्पष्ट झाले. सध्या हा उच्चशिक्षित नराधम अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात असून भारतीय समुदायात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.




