कोल्हापूर सर्किट बेंचच्या सूचनेनंतर हायकोर्टातील याचिका मागे; दीड महिना उलटूनही आमदारांची चौकशी न झाल्याने प्रकाशक प्रशांत आंबी आक्रमक
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड आणि ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील कायदेशीर लढाईला आता एक अत्यंत वेगळे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. कोल्हापूर सर्किट बेंच आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आता हा संपूर्ण खटला जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तांत्रिक कारणास्तव याचिका मागे घेण्याच्या (विड्रॉल) सूचना दिल्यामुळे आंबी कुटुंबीयांनी हायकोर्टातून माघार घेतली असली, तरी त्यांनी अन्यायाविरोधातील हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
कौम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि आतील मजकुरावरून वाद निर्माण झाला होता. या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्री फोन करून अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप प्रशांत आंबी यांनी केला होता. या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी आंबी कुटुंबीयांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रीट याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने प्रक्रियावादी निर्णय दिल्याने त्यांनी ही याचिका मागे घेतली असून, येत्या दोन-तीन दिवसांत ते जिल्हा सत्र न्यायालयात नवा खटला दाखल करणार आहेत.
पोलिसांच्या निष्क्रीयतेवर आणि पक्षपाती भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रशांत आंबी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक आणि आक्रमक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणतात “जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कायदेशीर परवानगी देऊन दीड महिना उलटला, तरी पोलिसांनी त्यांना साधे चौकशीसाठीही बोलावलेले नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी पोलीस सुरुवातीपासूनच सत्ताधारी आरोपीच्या बाजूने उभे आहेत. आपल्या देशात गरीबाला वेगळा न्याय, श्रीमंताला वेगळा न्याय आणि ज्याची सत्ता आहे त्याला पूर्णपणे वेगळा न्याय दिला जात आहे.”
प्रशांत आंबी यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. गायकवाड यांच्या कथित फोन कॉल्सनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने धमक्यांचे फोन येत आहेत. “मला पाकिस्तान आणि चीनमधून आर्थिक फंडिंग मिळते, मी नक्षलवादी आणि राष्ट्रद्रोही आहे, अशी माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी आमदार गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांकडून कोणताही तपास केला जात नसल्याचा दावा करत, जोपर्यंत या प्रकरणी योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत न्यायालयीन आणि कायदेशीर लढाई अत्यंत ताकदीने लढत राहणार असल्याचा पुनरुच्चार आंबी कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणातील घडामोडींमुळे आता कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




