सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी सुनेत्रा पवार मैदानात, शरद पवारांचीही घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर येत असून, नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात अंतर्गत विसंवाद आणि नाराजी नाट्य रंगात आले आहे. पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अधिकृत पत्रात अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाचा उल्लेख टाळण्यात आला, तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशचे अध्यक्ष टोको तातूंग यांच्या पदाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. या प्रकारामुळे सुनील तटकरे आणि पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी तटकरे आणि पटेल यांच्या क्षमतेचे कौतुक केले, परंतु त्यांच्या क्षमतेचा वापर कसा करायचा, हा आत्ताच्या नेतृत्वाचा अधिकार असल्याचे सूचक वक्तव्यही केले.
पक्षातील हा अंतर्गत कलह आणि मतभेदांची दरी वाढू लागल्याने आता सुनेत्रा पवार यांनी ‘डॅमेज कंट्रोल’साठी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी थेट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली असून, या वादावर पडदा टाकण्यासाठी लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांअभावी कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली असून, पक्षात आमदारांचे उघडपणे दोन तट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातील एक गट हा ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी उभा आहे, तर दुसरा गट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समर्थन करत आहे.
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी पार्थ पवार यांची कार्यपद्धती असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पार्थ पवार यांच्या राजकीय हालचालींना सुनेत्रा पवार यांचे पूर्ण समर्थन असल्यामुळेच पक्षात ज्येष्ठ नेत्यांची कोंडी होत असल्याची भावना काही आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की, पक्षातील एका बड्या नेत्याने थेट शरद पवार यांची भेट घेऊन पार्थ पवार यांना समज देण्याची विनंती केल्याचे समजते. आता या वाढत्या अंतर्गत वादात सुनेत्रा पवार यांना मध्यस्थी करून पक्षातील फूट रोखण्यात आणि डॅमेज कंट्रोल करण्यात कितपत यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




