Rohit Pawar : ‘नितेश राणे बिळाच्या बाहेर या, शेतकरी हिंदू नाहीत का?’ रोहित पवारांचा थेट हल्लाबोल

spot_img

मुख्यमंत्र्यांना दिला कांदा दरावरून पाठिंब्याचा शब्द आणि उद्धव ठाकरेंची केली पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह सत्ताधारी महायुती सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. रोहित पवार यांनी नितेश राणेंना थेट आव्हान देत विचारले की, जेव्हा शेतकरी संकटात असतो तेव्हा तुम्ही कुठे असता? शेतकरी हिंदू नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा जेव्हा अपमान होतो, तेव्हा बिळात लपून बसणारे हे नेते वरिष्ठांचा आदेश आला की नाचायला लागतात. विचार, भूमिका आणि कपडे बदलतात तसे पक्ष बदलणाऱ्या या नेत्यांची उंची आता जनतेला कळाली आहे, अशा टोमणेवजा शब्दांत त्यांनी राणेंचा समाचार घेतला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य आणि हक्काचा भाव दिला, तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्हीही पाठिंबा देऊ, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. देशातील शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीवर बोलताना त्यांनी, पैसेवाल्यांची मुले पुढे जात असून गरिबांची पोरं मागे राहत आहेत आणि याच नैराश्यातून तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत तीव्र चिंता व्यक्त केली.

पुण्यातील कल्याणीनगर अपघात आणि भोंदू बाबा खरात प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी एक खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी खरात याचा पोलीस कोठडीत घातपात किंवा एन्काउंटर केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी वर्तवली. महिलांवर झालेल्या अन्यायाची चौकशी झालीच पाहिजे, परंतु या प्रकरणात मंत्र्यांच्या बंगल्यावर झालेली काळी बाहुली, रक्त आणि पूजापाठ यामागील गूढ काय आहे, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. या प्रकरणात केवळ सर्वसामान्यांचे व्हिडिओ समोर आणून मोठ्या आणि प्रभावशाली लोकांचे व्हिडिओ कपाटात लपवून ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नाफेड कांदा खरेदीत सत्तेतील बडे नेते अडकले असून, हाच भोंदू खरात नेत्यांच्या जवळचा असल्याने पूजापाठ सोडून कांदा आणि जमिनी खरेदीच्या व्यवहारात पडला आहे, त्यामुळे या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी कशी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील अनुपस्थितीवरून होणाऱ्या टीकेला चोख उत्तर देत रोहित पवार यांनी त्यांची पाठराखण केली. उद्धव ठाकरे हे एका मोठ्या पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांना राज्याचा दौरा करावा लागतो, त्यांचे इतर आमदार सभागृहात विषय मांडायला सक्षम आहेत, असे ते म्हणाले. जर अनुपस्थितीवरूनच पदे काढायची असतील, तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांचीच पदे काढावी लागतील आणि मग हा आकडा थेट पंतप्रधानांपर्यंत जाऊन पोहोचेल, असा टोला त्यांनी लगावला. शेवट शेतकरी प्रश्नांवर बोलताना त्यांनी अजित पवारांची आठवण काढली. आधीचे अजित दादा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि कांद्याच्या भावासाठी नेहमी आक्रमक असायचे, असे सांगत आता त्यांचा पक्ष वेगळा असल्याने त्यांच्यावर अधिक बोलणार नाही, असे म्हणत रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ