Solapur : थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; बॅरिकेड्स तोडत तलावात उड्या

spot_img

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजकडून थकीत ऊस बिले न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारत नोटीस बजावली होती, तसेच तलाव परिसरात कडेकोट बंदोबस्त आणि बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था धुडकावून लावत बॅरिकेड्स तोडले आणि तलावात उड्या मारून आंदोलन केले.

गोकुळ साखर कारखान्याकडे ऊस पुरवून सहा ते सात महिने उलटूनही बिले मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, निलंगा तसेच अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गेल्या 16 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. प्रशासनाने वारंवार आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असली तरी, खात्यावर थकीत रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ