सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पिंपळनेर गावात एक मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या २२ दिवसांच्या नवजात बाळावर त्याच्या जन्मदात्या आईनेच अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळ सतत रडत असल्यामुळे संतापलेल्या आईने रागाच्या भरात चिमुकल्याला जमिनीवर आपटल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
या प्रकारात निष्पाप बाळ गंभीर जखमी झाले असून त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला तसेच दंडाच्या हाडाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी तपासणीनंतर बाळाच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट केले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. एवढ्या लहान बाळासोबत घडलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, ही घटना घरातील आजीमुळे उघडकीस आली. स्वतःच्या मुलीने आपल्या लेकरासोबत केलेला हा प्रकार पाहून आजी संतप्त झाली आणि तिने तत्काळ कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आईविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे मातृत्वाच्या संवेदनशील नात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समाजमाध्यमांसह परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.




