मुंबई महानगरपालिकेला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या ई-मेलद्वारे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांच्या अधिकृत वाहनासह महापालिका मुख्यालयातील कार्यालय बॉम्बस्फोटातून उद्ध्वस्त करण्याचा इशाराही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर धमकीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधत सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत.
धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सायबर सेलने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि त्याची विश्वासार्हता किती आहे, याचा शोध तांत्रिक माध्यमांतून घेतला जात आहे. दरम्यान, अलीकडेच पुणे महापालिकेलाही अशाच प्रकारची धमकी मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेलाही लक्ष्य करण्यात आल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महापालिका मुख्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




