Chhatrapati Sambhajinagar : महिला अधिकाऱ्याला अश्लील मेसेज धाडून जीवे मारण्याची धमकी; राष्ट्रवादीचा कथित तालुकाध्यक्ष पोलिसांच्या रडारवर!

spot_img

“तुझ्या मुलीला गायब करेन…” पाचोडमध्ये महिला मंडळ अधिकाऱ्याला जाहीर धक्काबुक्की करत कुटुंबाला संपवण्याची धमकी देणाऱ्या युवराज चावरेवर गुन्हा दाखल!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आणणारा एक संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. विहामांडवा विभागात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी आणि थेट त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका मुजोर राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज चावरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पैठण तालुकाध्यक्ष असल्याचे सांगून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि शासकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना आरोपी युवराज चावरे याने त्यांच्या व्हॉट्सॲपवर सातत्याने अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवून छळ सुरू केला होता. “मला तुला वैयक्तिक भेटायचे आहे” असे सांगत त्याने महिला अधिकाऱ्याला प्रचंड मानसिक त्रास दिला. महिला अधिकाऱ्याने या विकृत प्रकाराला तीव्र विरोध दर्शवल्यानंतर आरोपीची मुजोरी आणखी वाढली. तो थेट तहसील कार्यालयात घुसला आणि त्याने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांदेखत महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता “तुझे घर मला ठाऊक आहे, तुझ्या मुलीला गायब करून टाकीन,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. या जाहीर अपमानामुळे आणि भीतीपोटी महिला अधिकाऱ्याने अखेर पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी युवराज चावरे विरुद्ध विनयभंग, आयटी ॲक्ट आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ