जे. पी. नड्डा यांनी दोन तास ताटकळत ठेवून दिली फक्त १० मिनिटांची भेट; संसद भवनाबाहेर ७५ हजार विद्यार्थ्यांचा गराडा
‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ गेल्या ३० दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर अत्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाने अखेर आज कमालीचे आक्रमक आणि रौद्र रूप धारण केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज संसदेवर महामोर्चा काढण्याची हाक दिली होती. हा मोर्चा मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रविवार रात्रीपासूनच जंतरमंतर परिसराची पूर्णपणे नाकेबंदी करत पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह शेकडो आंदोलक विद्यार्थ्यांना तिथेच कोंडून ठेवले होते. मात्र, पोलिसांना चकवा देत सीजेपी समर्थकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक दुसरा अथांग जनसागर थेट संसद भवनाच्या परिसरात दाखल झाल्याने सुरक्षा यंत्रणांची एकच दाणादाण उडाली. या अभूतपूर्व जनक्षोभानंतर सोमवारी दुपारी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत सीजेपीचे मुख्य नेते अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडियावरून या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एकीकडे जंतरमंतर आणि संसद परिसरात पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांना निर्घृणपणे मारहाण करत असताना, दुसरीकडे सरकारने वाढता दबाव पाहून आंदोलकांशी चर्चा करण्याचा देखावा सुरू केला. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी चर्चेसाठी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना बोलावले होते. मात्र, या भेटीनंतर सरकारने आंदोलकांची थट्टा केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. “केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आम्हाला तब्बल दोन तास बाहेर ताटकळत ठेवले आणि त्यानंतर केवळ १० मिनिटांची जुजबी भेट दिली,” असे सौरव दास यांनी ट्विट करून सांगितले. त्यांनी या भेटीत आपल्या मागण्यांचे लेखी पत्र नड्डा यांच्याकडे सुपूर्द केले असून मंत्र्यांनी यावर पुढे चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सौरभ दास यांनी देशातील सर्व खासदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी पक्षाभेद विसरून रस्त्यावर उतरलेल्या या निष्पाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, कारण पोलीस अत्यंत क्रूरतेने शांततापूर्ण आंदोलन चिरडत आहेत.
दुसरीकडे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार, संसद भवनाच्या आसपासच्या परिसरात जवळपास ७५,००० आंदोलक विद्यार्थी आणि नागरिक एकत्र जमले होते. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या जमावामुळे संपूर्ण ल्युटियन्स दिल्लीत पोलिसांची मोठी धावपळ उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लोखंडी बॅरिकेड्सच्या मोठ्या रांगा उभारल्या होत्या, मात्र संतप्त विद्यार्थी या बॅरिकेड्सवर चढून संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार करत जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. सध्या संसद परिसरात अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून संपूर्ण दिल्लीत लष्करी छावणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.




