New Delhi : संसदेच्या पहिल्याच दिवशी ‘संसद मोर्चा’मुळे राडा; जंतरमंतरवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

spot_img

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान तणाव; विरोधी नेते मैदानात, मेट्रो स्थानके आणि इंटरनेट सेवेवर निर्बंध

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत प्रचंड राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या ‘संसद मार्च’मुळे दिल्लीच्या जंतरमंतर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी थेट लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लाठीचार्जमुळे जंतरमंतर परिसरात प्रचंड गोंधळ आणि पळापळ झाली असून आंदोलन अधिकच चिघळले आहे.

या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने संपूर्ण दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक संवेदनशील मेट्रो स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांचे प्रवेश आणि निकास द्वार (एन्ट्री-एग्झिट) बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, आंदोलक आणि जमावामध्ये समन्वय रोखण्यासाठी जंतरमंतर व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा देखील जाम (खंडित) करण्यात आली आहे. जागोजागी तैनात असलेल्या पोलिसांकडून परिस्थितीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवले जात असून, परिस्थितीनुसार तातडीने पावले उचलली जात आहेत.

विशेष म्हणजे, या विद्यार्थी आंदोलनाला देशातील प्रमुख विरोधी नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह, आझाद समाज पार्टीचे प्रमुख व खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आणि प्रख्यात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या पत्नी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामुळे या आंदोलनाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

आंदोलनात सहभागी झालेले खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सरकार आणि प्रशासनावर कडक शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकार आणि पोलीस आपापली भूमिका आणि कर्तव्य बजावत असले, तरी मी या देशाच्या मातीशी प्रामाणिक राहून माझे कर्तव्य पार पाडत आहे. भारतीय तरुण सध्या ज्या त्रासातून आणि दुःखातून जात आहेत, ते मी समजू शकतो. तरुणांवर सातत्याने अन्याय होत असून सरकार या अन्यायाकडे डोळेझाक करत आहे. याच अन्यायाविरुद्ध तरुणांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांना खंबीर साथ देण्यासाठी मी या आंदोलनात उतरलो आहे. सध्या जंतरमंतरवरील परिस्थिती कमालीची तणावपूर्ण असून आंदोलक अद्यापही मागे हटायला तयार नाहीत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ