ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने स्वतःच्या वडिलांसह सख्ख्या भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बगाडवाडी (पारगाव तर्फे मढ) येथील जयराम मुकणे आणि त्यांचा मुलगा राजू मुकणे हे शेतातील पत्राशेडमध्ये असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी बाबजी मुकणे याने कौटुंबिक वादातून आणि लग्नाच्या कारणावरून संतापाच्या भरात दोघांवर लाकडी वस्तूने हल्ला केला. त्यानंतर डोक्यावर दगड टाकून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मयतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हत्येमागील सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.




