नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची हकालपट्टी; दिल्लीतील घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचालींना वेग.
नीट पेपरफुटी घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि देशातील तरुणाईने मागील महिनाभरापासून पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला या माध्यमातून मोठे यश आले आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या लढाऊ युवाशक्तीचे खुलेआम कौतुक केले आहे. “देशातील लोकशाहीने कात टाकली असून, दडपशाहीला न जुमानता अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणाऱ्या युवाशक्तीच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे,” अशी स्तुत्य प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तसेच, या संघर्षात युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षातील सर्व खासदारांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या या राजीनाम्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा रंगली आहे. या राष्ट्रीय राजकारणातील मोठ्या भूकंपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचाली तीव्र झाल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्शभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले असून ते रात्रीच दिल्लीकडे रवाना होणार आहेत. या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात काय नवीन समीकरणे जुळतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.




