राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला असून, पुणे आणि लोणावळ्यातील जलाशयांमध्येही पाण्याचा जलसाठा वेगाने वाढला आहे
सध्या राज्यात मुसळधार पाऊस बरसत् असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख जलाशयांमध्ये गेल्या २४ तासांत ६.०६ टक्क्यांची वाढ होऊन एकूण पाणीसाठा ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांची पुढील १० ते ११ महिन्यांची पाण्याची चिंता मिटली असली, तरी पालिकेने अद्याप १० टक्के पाणी कपात कायम ठेवलेली आहे. दुसरीकडे, पुणे आणि लोणावळ्यातही पावसाने जोरदार तडाखा दिला असून, खडकवासला धरण साखळीत २४.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा अधिक असून, पवना धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने धरणातून ७ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पुण्यातील खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत असून, खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळ्यात मागील २४ तासांत २३५ मिमी पावसाची नोंद झाली असून, यावर्षी तिथे आतापर्यंत ३५३१ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे येथील निसर्गसौंदर्य पूर्णपणे बहरले असून पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.




