Supriya Sule : पिक्चर अभी बाकी है…’; इंधन दरवाढ आणि महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, तर लेकीच्या लग्नासाठी मोदींना दिले निमंत्रण

spot_img

पंतप्रधानांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले, तरी ही भेट पूर्णपणे कौटुंबिक आणि मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती व केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “देशात सध्या सुरू असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही तर केवळ सुरुवात आहे, ‘पिक्चर अभी बाकी है’…” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबईतील पेट्रोल पंप बंद पडण्याच्या स्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या की, या परिस्थितीचे मला अजिबात नवल वाटत नाही. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी या विषयावर परस्परांच्या विरोधी विधाने केली होती. फडणवीसांनी इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगून काळजी न करण्याचे आवाहन केले, तर भुजबळांनी ३० दिवसांचाच साठा शिल्लक असून ते काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला. या गोंधळाचा नेमका अर्थ काय काढायचा आणि सरकारचे काय नियोजन आहे, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या सहा महिन्यांपासून हाच प्रश्न मांडत असताना सरकार सत्य का लपवत आहे, अशी तोफही त्यांनी डागली.

राजकीय संघर्षाच्या पलीकडे जात सामान्य जनतेच्या जगण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली. निवडणुका येत-जात राहतील, पण प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सामान्य माणसाने कसे जगायचे, असा प्रश्न त्यांनी विचारला. “घरी जाऊन भाज्यांचे आणि कांद्याचे भाव विचारा, म्हणजे वस्तुस्थिती समजेल. एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे तो ग्राहकांना परवडत नाही,” असे त्या म्हणाल्या. लोकशाही विरुद्ध दडपशाही अशा लढाईत आपण नेहमीच दडपशाहीविरोधात उभे राहू, असे स्पष्ट करताना त्यांनी खासदार निलेश लंके यांचे कौतुक केले. निलेश लंके हे दिल्लीत कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत, मात्र सरकारमधील जबाबदार मंत्री या गंभीर विषयावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे सरकारवर घणाघाती राजकीय प्रहार करत असतानाच, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या एका कौटुंबिक भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या परिवारासह नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट राजकीय नसून पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाची होती. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या आगामी विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी हे कुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांची मुलगी रेवती, होणारे जावई सारंग लखानी आणि नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी व त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. हा भव्य विवाहसोहळा मुंबईतच संपन्न होणार असून, सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी हे नामांकित ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक आणि एक प्रख्यात व्यावसायिक घराण्यातील सदस्य आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ