अभिनेते विजय पाटकरांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा दावा; कलाक्षेत्र राजकारण्यांनी बळकावल्याची टीका
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत असून, सध्या या निवडणुकीत कमालीचा राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महामंडळात राजकीय पक्षांनी शिरकाव केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी काही दिवसांपूर्वीच महामंडळावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्याकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. “नीलम शिर्के जर अध्यक्षा होत असतील तर मला काही अडचण नाही, पण माझा स्वतःचा उमेदवारी अर्जसुद्धा भरू दिला गेला नाही,” अशी उद्विग्न तक्रार पाटकरांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नक्कीच आहे, पण तो थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आहे का, हे मला माहीत नाही, असे सूचक वक्तव्य पाटकरांनी केले होते.
याच विधानाचा धागा पकडत आता शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट लिहीत अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. विजय पाटकरांसारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, ही बाब अतिशय गंभीर आहे. नेते जोपर्यंत अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे, पण ते जेव्हा कलाकारांच्या हक्काचे कलाक्षेत्रच बळकावू लागतात, तेव्हा ते दुर्दैवी असते,” अशा तिखट शब्दांत अंधारेंनी सामंतांवर प्रहार केला.
“मंत्र्यांचे ओएसडी (OSD) मागील चार दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत आणि लोकांवर प्रचंड दबाव आणत आहेत. आमची वर्षानुवर्षांची कामं सोडून आम्ही कधी राजकारण्यांकडे जात नाही, मग त्यांनी आमच्या क्षेत्रात कशाला हस्तक्षेप करावा?” विजय पाटकर (ज्येष्ठ अभिनेते)
चित्रपट महामंडळाच्या या निवडणुकीत यंदा अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मावळत्या संचालिका आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पुन्हा एकदा आपले नशीब अजमावण्याचे ठरवले असून, त्यांच्यासमोर अभिनेत्री नीलम शिर्के यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र, या अंतर्गत लढाईत आता थेट राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यामुळे, मराठी कलाविश्व आणि राजकीय वर्तुळात वादाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे.




