रक्तातील साखर आणि वजन नियंत्रणात ठेवणारे कारले होईल चविष्ट; स्वयंपाकघरातील ५ गोष्टी येतील कामी
कारले आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे, पचनसंस्था मजबूत करणे आणि वजन कमी करणे यांसाठी कारल्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र, कारल्याच्या अति-कडवट चवीमुळे अनेकजण, विशेषतः लहान मुले, ही भाजी खाणे टाळतात. कारल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे त्याला हा कडूपणा येतो, जो जिभेवर रेंगाळत राहतो. जर तुम्हालाही कारल्याचा हा कडवटपणा आवडत नसेल, तर स्वयंपाकघरातील काही साध्या आणि सोप्या घटकांचा वापर करून तुम्ही त्याची चव चविष्ट आणि सौम्य करू शकता.
कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी मीठ हा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय आहे. कारल्याचे तुकडे करून त्यांना मीठ चोळून काही वेळ बाजूला ठेवावे. मिठाच्या संपर्कात आल्यामुळे कारल्याला पाणी सुटते, ज्याच्या माध्यमातून त्यातील कडू रस बाहेर पडतो. त्यानंतर हे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यास कडूपणा खूप कमी होतो. याशिवाय, दह्याचा वापर करणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. दह्यातील आंबटपणा आणि लॅक्टिक ॲसिड कारल्याच्या बाहेरील थरावर प्रक्रिया करून त्याची चव संतुलित करतात, ज्यामुळे कडवटपणा जाणवत नाही.
तसेच, हळदीचा तीव्र सुगंध आणि त्यातील ‘कर्क्युमिन’ हा घटक कारल्याची चव सुधारण्यास मदत करतो. भाजी बनवताना कारल्यामध्ये हळद मिसळल्यास तिचा सौम्य तिखटपणा कडूपणावर मात करतो. कारल्याची भाजी करताना त्यात कांदा घालणे देखील फायदेशीर ठरते. शिजताना कांद्याला येणारा नैसर्गिक गोडवा कारल्याच्या कडूपणाचा प्रभाव कमी करतो, ज्यामुळे भाजीची चव छान लागते. शेवटी, कारले शिजवण्यासाठी मोहरीचे तेल वापरल्यास, तेलाच्या तीव्र आणि वैशिष्ट्यपूर्ण सुगंधामुळे कारल्याचा उग्र व कडू वास नाहीसा होतो. हे साधे उपाय करून तुम्ही कारल्यासारखी पौष्टिक भाजी न कुरकुर करता आनंदाने खाऊ शकता.




