२०११ च्या विश्वविजेतेपदासाठी घेतलेल्या ‘त्या’ कठोर निर्णयाचा श्रीकांत यांनी केला उलगडा; अष्टपैलू खेळाडूंना का दिलं होतं प्राधान्य?
भारतीय क्रिकेट इतिहासात २०११ चा वनडे वर्ल्ड कप विजय हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २८ वर्षांनंतर विश्वचषकावर नाव कोरलं आणि अवघा देश आनंदात न्हाऊन निघाला. मात्र, या ऐतिहासिक विजयासाठी निवड समितीला काही अत्यंत कठीण आणि वादग्रस्त निर्णय घ्यावे लागले होते. त्यापैकीच एक म्हणजे, त्यावेळी उगवता तारा आणि प्रचंड टॅलेंटेड समजल्या जाणाऱ्या रोहित शर्माला संघातून डच्चू देणे. रोहितला विश्वचषक संघात स्थान न मिळाल्याने त्यावेळी निवड समितीवर टीकेची झोड उठली होती. आता तब्बल १५ वर्षांनंतर, त्यावेळचे निवड समितीचे अध्यक्ष कृष्णमचारी श्रीकांत यांनी या निर्णयामागील गुपित उघड केले आहे.
श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितला वगळण्याचा निर्णय त्याच्या क्षमतेवर शंका होती म्हणून घेतला नव्हता. उलट, १९८३ च्या विश्वचषक विजयाचा फॉर्म्युला २०११ मध्येही वापरण्यात आला होता. श्रीकांत म्हणाले की, “आम्ही स्पेशलिस्ट फलंदाजांऐवजी अष्टपैलू खेळाडूंना (All-rounders) संघात घेण्याला प्राधान्य दिले होते. संघाची त्यावेळची रणनीती आणि गरज लक्षात घेऊनच रोहितची निवड केली नव्हती.” हा निर्णय जाणीवपूर्वक रोहितच्या विरोधात नव्हता, तर निव्वळ संघाच्या संतुलनासाठी घेतलेला एक तांत्रिक निर्णय होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मात्र, इतकी वर्ष उलटल्यानंतरही रोहितला त्या संधीपासून वंचित ठेवल्याची खंत श्रीकांत यांच्या मनात आजही कायम आहे. ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की, “रोहितला त्या वर्ल्ड कप टीममध्ये न निवडल्याचं मला आजही वाईट वाटतं. मी मागच्या वर्षी स्वतः रोहितची भेट घेऊन याबद्दल त्याची माफीही मागितली.” त्या धक्क्यानंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिले नाही आणि आज तो जगातील सर्वोत्तम मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू बनला आहे. श्रीकांत यांनी व्यक्त केलेली ही खेदजनक भावना म्हणजे एका महान खेळाडूच्या प्रवासात आलेल्या संघर्षाची आणि निवड समितीच्या कठीण प्रक्रियेची साक्ष देणारी ठरली आहे.




