वुमन्स टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या मोहिमेची सुरुवात अत्यंत दिमाखात आणि दणदणीत विजयाने केली आहे. या महाकुंभातील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. भारताने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या १०६ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तान संघ १७ ओव्हर्समध्येच पत्त्यासारखा कोसळला आणि भारताने हा सामना ६४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताच्या या ऐतिहासिक विजयाची मुख्य शिल्पकार ठरली ती अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा, जिने आपल्या फिरकीच्या जोरावर पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे तोडले.
या सामन्यात दीप्ती शर्माने ४ ओव्हर्सच्या स्पेलमध्ये कमालीची शिस्तबद्ध गोलंदाजी केली. तिने टाकलेल्या २४ चेंडूंपैकी तब्बल १४ चेंडू ‘डॉट’ (एकही धाव न दिलेले) होते. तिने अवघ्या १० धावा खर्च करून पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ५ विकेट्स घेण्याची दीप्तीची ही दुसरी वेळ आहे. या जादुई कामगिरीसह तिने भारताच्याच रेणुका सिंह (१५ धावांत ५ विकेट्स, २०२३) आणि प्रियांका रॉय (१६ धावांत ५ विकेट्स, २००९) यांना मागे टाकत टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वात किफायतशीर ५ विकेट्स घेण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला.
पाकिस्तानविरुद्धच्या या ५ विकेट्ससह दीप्ती शर्माने जागतिक क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. ती आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. तिने थायलंडच्या पुथावोंग हिला मागे टाकत हा बहुमान मिळवला असून, आता दीप्तीच्या नावावर १४५ टी-२० सामन्यांत तब्बल १६६ विकेट्सची नोंद झाली आहे. एवढेच नव्हे तर, सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकार (कसोटी, वन-डे, टी-२०) मिळवून ३५० विकेट्सचा टप्पा पार करणारी ती जगातील पहिली महिला फिरकीपटू (Spinner) बनली आहे.
सामन्यात ५ विकेट्स घेण्यासोबतच फलंदाजीत मौल्यवान १२ धावांचे योगदान देणाऱ्या दीप्ती शर्माला तिच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (सामनावीर) पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कारासह ती टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्तीने हा पुरस्कार दुसऱ्यांदा जिंकला असून, या यादीत माजी कर्णधार मिताली राज (३ वेळा) दुसऱ्या तर सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर (४ वेळा) पहिल्या क्रमांकावर आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून संपूर्ण देशातून महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




