महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी वाढताना दिसत आहे. काही संघटनांनी या नियमाला तीव्र विरोध दर्शवला असून, सुमारे १४ लाख रिक्षाचालकांनी ४ मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, मोटार परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत चालकांना मराठी भाषा वाचता आणि लिहिता येते का, याची चाचणी घेतली जाईल. जर चालकांना मराठी येत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यात काम करणाऱ्या चालकांना स्थानिक भाषा येणे गरजेचे आहे. मात्र, अमराठी चालकांकडून या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे.
जर हा संप प्रत्यक्षात झाला, तर मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.




