टी-२० वर्ल्ड कप गाजवला अन् आता आयपीएलमध्येही धमाका; ‘स्लॉगर’ म्हणणाऱ्या टीकाकारांची बोलती बंद
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात डागाळलेला खेळाडू मोहम्मद अमीर याने भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माबद्दल केलेल्या विखारी टीकेला अभिषेकने आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. “अभिषेक शर्मा हा काही उत्तम फलंदाज नाही, त्याची बॅट चालली तर चालली, नाहीतर काही नाही,” असे विधान अमीरने एका टीव्ही शो दरम्यान केले होते. मात्र, अभिषेकने केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर अमीरचे हे दावे पोकळ ठरवले नाहीत, तर जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टी-२० वर्ल्ड कपमधील दोन निर्णायक खेळी या अमीरच्या विधानावर बसलेली मोठी चपराक ठरली आहे.
टी-२० वर्ल्ड कपमध्ये जेव्हा अभिषेकच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तेव्हाच त्याने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताला नेट रनरेट सुधारण्याची गरज असताना अभिषेकने अवघ्या ३० चेंडूत ५५ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने २५६ धावांचा ऐतिहासिक डोंगर उभारला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये २१ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी करत त्याने भारताला ९६ धावांनी एकतर्फी विजय मिळवून दिला. वर्ल्ड कपमधील अभिषेकच्या या कामगिरीने त्याला ‘स्लॉगर’ म्हणणाऱ्या अमीरला आरसा दाखवला आहे.
अभिषेक शर्माचा हा फॉर्म केवळ वर्ल्ड कपपुरता मर्यादित राहिला नाही, तर आयपीएल २०२६ मध्येही तो सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळताना आग ओकत आहे. आतापर्यंतच्या सात सामन्यांपैकी चार सामन्यांत त्याने आपली छाप पाडली असून त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. ४८ धावांची खेळी करून त्याने आपण केवळ मोठे फटके मारणारे फलंदाज नसून सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू आहोत हे सिद्ध केले आहे. त्यामुळे “हुशारीने गोलंदाजी केल्यास अभिषेकवर वरचढ ठरता येते,” असे म्हणणाऱ्या अमीरला आता अभिषेकची ही ‘विराट’ खेळी पाहून दहा वेळा विचार करावा लागेल. एका युवा भारतीय खेळाडूने आपल्या खेळाने टीकाकारांचे तोंड कसे बंद करावे, याचा हा उत्तम नमुना आहे.




