माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडत आहे. बारामतीसोबतच राहुरी मतदारसंघातही मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू असून, सकाळपासूनच मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत बारामतीमध्ये सुमारे ८.१ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मतदान केंद्रांवर लवकरच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले, त्यामुळे दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा मतदानाचा टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, ज्यामुळे लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी स्वतः मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. पार्थ पवार, सुप्रिया सुळे, त्यांची मुलगी रेवती सुळे आणि इतर कुटुंबीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. तसेच रोहित पवार यांनी कुटुंबासह मतदान करून सहभाग नोंदवला. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता वाढत आहे.




