ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील नेतवड कुटेमळा येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा ओतूर पोलिसांनी जलद तपास करत आरोपीला अटक करून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाबा महादू कुटे (वय ९५) यांच्या घरातील पोटमाळ्यात ठेवलेली पेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील सुमारे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या दागिन्यांमध्ये मनीमंगळसूत्र, सोन्याची पाने, पुतळा, नथ तसेच सोन्याच्या पेट्या यांचा समावेश होता. चोरी गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख २० हजार रुपये इतकी होती. ही घटना १ मे ते ७ मे दरम्यान घडली होती.
या प्रकरणी तान्हाजी बजाबा कुटे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा तसेच परिसरातील हालचालींचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादींच्या घराजवळ राहणारा अभिषेक खंडू कुटे (वय ३२) हा संशयाच्या भोवऱ्यात आला. सध्या तो टिटवाळा येथे राहत असून मूळचा नेतवड कुटेमळा येथील आहे.
पोलिसांनी अभिषेक कुटे याला १३ मे रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात तीन तोळ्यांचे मनीमंगळसूत्र, अडीच तोळ्यांची सहा सोन्याची पाने व पुतळा, अर्धा तोळ्याची नथ आणि सोन्याच्या पेट्या असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली.




