माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी नाते असल्याचा आरोप फेटाळला; कोर्टात लढा देण्याचा पटेलांचा निर्धार
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) लैंगिक शोषण आणि सक्तीचे धर्मांतरण प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम (MIM) पक्षाचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. या संवेदनशील प्रकरणात नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) मतीन पटेल यांची आतापर्यंत दोन ते तीन वेळा कसून चौकशी केली आहे. नुकत्याच झालेल्या ताज्या चौकशीत पटेल यांनी निदा खानची आणि त्यांची भेट कशी झाली, तसेच त्यांची ओळख कशी पटली, याबाबातचा संपूर्ण तपशील पोलिसांना दिला आहे.
दुसरीकडे, शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत निदा खान ही एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची जवळची नातेवाईक असल्याचा दावा केला होता. या राजकीय टीकेला मतीन पटेल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पटेल यांनी स्पष्ट केले की, निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यात कोणतेही नातेसंबंध नसून विरोधकांचे हे आरोप धादांत खोटे आहेत. “तपासादरम्यान मी स्वतः पोलिसांना जलील यांना फोन लावण्यास सांगितले होते. जलील हे माझे पक्षनेते असल्याने अडचण आल्यास मी त्यांच्याशी संपर्क साधतो. मात्र, या प्रकरणाशी किंवा निदा खानशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही. ती माझ्याकडे वास्तव्याला असताना आमच्यात एकदाही फोनवर बोलणे झालेले नाही आणि याचे कॉल रेकॉर्डिंग्स माझ्याकडे सुरक्षित आहेत,” असा दावा त्यांनी केला. तसेच नाशिकच्या पालकमंत्र्यांचे जलील यांच्यावर ‘विशेष प्रेम’ असल्यानेच ते राजकीय हेतूने वारंवार त्यांचे नाव घेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
आपली बाजू मांडताना मतीन पटेल यांनी सांगितले की, निदा खान नेमकी कोण आहे आणि तिच्यावर काय आरोप आहेत, याची आपल्याला पुसटशीही कल्पना नव्हती. निदाच्या आई-वडिलांनी आणि त्यानंतर स्वतः तिने फोन केल्यानंतर ती माझ्या कार्यालयात आली होती. केवळ ओळखीतून आणि माणुसकीच्या नात्याने मी तिला २ ते ३ दिवसांसाठी राहण्यासाठी खोली उपलब्ध करून दिली होती. या प्रकरणात आपण काहीही चुकीचे किंवा बेकायदेशीर काम केले नसल्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगत, या अन्यायाविरोधात न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्या व्यक्तीला आपण घर विकले, त्यालाही या प्रकरणात विनाकारण गोवून त्याचे घर तोडण्यात आल्याचा गंभीर आरोपही मतीन पटेल यांनी प्रशासनावर केला आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिकचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.




