चित्रपटाचे नियम मोडणे, कोरोना नियमांचे उल्लंघन आणि पाकिस्तान कनेक्शन ठरले होते कारण
दिग्दर्शक फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित ‘डॉन ३’ (Don 3) या चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे अभिनेता रणवीर सिंग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने या कारणास्तव रणवीर सिंगवर बंदी (Non-Cooperation) जारी केली आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत अशा प्रकारच्या कारवाईचा सामना करणारा रणवीर हा पहिलाच कलाकार नाही. यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर वेगवेगळ्या कारणांमुळे फेडरेशनकडून बंदी घालण्यात आली होती.
या यादीत नक्की कोणकोणत्या बड्या स्टार्सचा समावेश होता आणि त्यांच्यावर का कारवाई झाली, याचा घेतलेला हा सविस्तर आढावा:
१. चंकी पांडे (Chunky Panday)
१९८७ मध्ये बॉलिवूडमध्ये कामगारांचा मोठा संप पुकारण्यात आला होता, ज्या दरम्यान कोणत्याही चित्रपट चित्रीकरणाला परवानगी नव्हती. असे असतानाही ‘आग ही आग’ या चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी यांनी बंगळूर आणि उटी येथे चित्रपटाचे शूटिंग सुरूच ठेवले. नियमांचे हे उल्लंघन केल्यामुळे अभिनेता चंकी पांडे यांच्यावर तेव्हा ‘FWICE’ कडून बंदी घालण्यात आली होती.
२. दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशनने भारतीय कलाकारांना पाकिस्तानी नागरिकांसोबत काम न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दिलजीत दोसांझ सह-निर्माता असलेल्या ‘सरदार जी ३’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे फेडरेशनने आपल्या ५ लाख कर्मचाऱ्यांना दिलजीतसोबत काम न करण्याचे आदेश दिले आणि त्याला ‘बॉर्डर २’ चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली. अखेर चित्रपट निर्माते भूषण कुमार यांच्या मध्यस्थीनंतर दिलजीतला ‘बॉर्डर २’ चे शूटिंग पूर्ण करण्याची मुभा मिळाली.
३. मिका सिंग (Mika Singh)
प्रसिद्ध गायक मिका सिंग याने २०१९ मध्ये दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचलेला असताना थेट पाकिस्तानमधील कराची शहरात जाऊन एका हाय-प्रोफाइल लग्नात गाण्याचा कार्यक्रम केला होता. हे लग्न पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या जवळच्या नातेवाईकाचे होते. भारतात यावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर मिकावर बंदी आणली गेली. अखेर मिका सिंगने फेडरेशनची माफी मागितल्यानंतर ही बंदी एका आठवड्यात मागे घेण्यात आली.
४. साजिद खान (Sajid Khan)
भारतात गाजलेल्या ‘मी टू’ (Me Too) मोहिमेदरम्यान अनेक महिलांनी आणि अभिनेत्रींनी दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत FWICE ने साजिद खानवर चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी एका वर्षाची कडक बंदी घातली होती.
५. गौहर खान (Gauahar Khan)
२०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात अभिनेत्री गौहर खान कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. डॉक्टरांनी तिला होम क्वारंटाईन राहण्याचा कडक सल्ला दिला असतानाही, तिने नियमांचे उल्लंघन करून एका चित्रपटाच्या सेटवर शूटिंग गाठले. मुंबई महानगरपालिकेने (BMC) तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर, FWICE ने तिच्या बेजबाबदार वर्तनासाठी दोन महिन्यांची कठोर बंदी घातली होती.




