Sai Tamhankar : ‘मटका किंग’ नंतर सई ताम्हणकरचा नवा धमाका; ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका!

spot_img

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सईच्या नव्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

आपल्या दर्जेदार अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिकांच्या जोरावर मराठीसह बॉलिवूडवरही अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तुफान चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘मटका किंग’ ही वेब सीरिज जगभरात ट्रेंड झाल्यानंतर, आता सई पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या आणि तितक्याच वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. “तुंबाडची मंजुळा” असे या आगामी चित्रपटाचे नाव असून सई यामध्ये अत्यंत लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजेच ‘मंजुळा’ स्वतः सई ताम्हणकरच असणार का? आणि ती नेमकी कोणती रहस्यमय भूमिका साकारणार? याविषयी आता प्रेक्षकांमध्ये आणि सिनेसृष्टीत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गतवर्षी म्हणजे २०२५ मध्ये ‘गुलकंद’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते, त्यानंतर आता २०२६ मध्ये “तुंबाडची मंजुळा” या चित्रपटाच्या माध्यमातून सई पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे.

सई ताम्हणकर ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी कधीही एकाच प्रकारच्या चौकटीत अडकून पडत नाही. तिने आजवर निवडलेले चित्रपट आणि वेब सीरिज तिच्या अभिनयाची अष्टपैलुता सिद्ध करतात. ‘दुनियादारी’, ‘वजनदार’, ‘पाँडिचेरी’, ‘मिडियम स्पायसी’ आणि ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच तिने हिंदी डिजिटल प्लॅटफॉर्मवरही (OTT) आपला मोठा दबदबा निर्माण केला आहे. बॉलिवूडमधील ‘मिमी’ चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय ‘मानवत मर्डर्स’, ‘बेरोजगार’, ‘डब्बा कार्टेल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ आणि नुकतीच आलेली ‘मटका किंग’ या हिंदी-मराठी वेब सीरिजमधील तिच्या कामाचे जगभरात कौतुक झाले. आगामी काळातही सई ताम्हणकर अनेक बड्या हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ