Sanjay Raut : ‘नीट’ पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र, संपूर्ण रॅकेट भाजपचेच; संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर थेट हल्लाबोल

spot_img

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर आणि इंधन दरवाढीवरूनही खासदार राऊतांचा घणाघाती आरोप

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “या संपूर्ण पेपरफुटीचे केंद्र दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातच असून, त्याचा विस्तार लातूरपासून पुण्यापर्यंत झालेला आहे,” असा दावा राऊत यांनी केला. हे रॅकेट भाजपच्याच प्रमुखांनी आणि नेत्यांनी संगनमताने तयार केले असल्याचा थेट आरोप त्यांनी केला असून या नवीन विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या गैरव्यवहारासाठी जबाबदार धरले आहे. सीबीआयने या प्रकरणात चेतन शाह आणि पुण्या-लातूरमधील शिक्षकांना अटक केल्याचा दाखला देत राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात काहीही वाईट घडले की कुठे ना कुठे हे कनेक्शन समोर येतेच. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर एक चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यांनी यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी एकतरी पत्रकार परिषद घ्यावी.” न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि पोलिसांप्रमाणेच स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणाही भाजपने आपल्या ताब्यात घेतली असून त्यांनी देशातील एका संपूर्ण पिढीचे आयुष्य बरबाद केल्याचा घणाघात त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी देशातील वाढत्या इंधन दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तीव्र शब्दांत निशाणा साधला. देशातील जनतेवर सातत्याने इंधन दरवाढीचा बोजा टाकला जात असताना पंतप्रधान मात्र परदेश दौऱ्यावर जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. “जनतेने घराबाहेर पडू नये, प्रवास करू नये आणि इंधनाची बचत करावी, असा अजब सल्ला सरकार देत आहे. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर व नाजूक झाली असून देशात ‘आर्थिक तुफान’ येणार आहे, हे राहुल गांधींचे म्हणणे तंतोतंत खरे ठरणार आहे. परंतु, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री जमिनीवर नसून हवेत तरंगत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

जगात आणि देशात महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा मान-सन्मान होता. मात्र, या पेपरफुटीच्या रॅकेटमुळे राज्याची नाचक्की झाली असून, सीबीआय कारवाई करत असताना राज्यातील गृहखाते आणि स्थानिक पोलीस काय करत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ