Sanjay Raut : ‘आम्ही रामाचे आजीव भक्त, हिंदुत्वाचे मालक तुम्ही कधीपासून झालात?’; संजय राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

spot_img

“नागपूरच्या ‘राम रक्षा’ आंदोलनात देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सहभागी व्हावं”; शिवसेना खासदार संजय राऊतांचे जाहीर आव्हान!

“देशात सध्या अनेक मोठ्या घडामोडी वेगाने घडत आहेत आणि घडवल्या जात आहेत. मात्र, या सर्व गंभीर परिस्थितीवर सध्याचे सरकार पूर्णपणे निष्क्रिय आणि शांत बसले आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांनी जाहीर केले की, देशातील विविध महत्त्वाच्या आणि ज्वलंत मुद्द्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः जनतेसमोर येऊन भूमिका मांडावी, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. त्यानुसार आज दुपारी १२.३० वाजता उद्धव ठाकरे एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार आहेत.

धार्मिक कार्यक्रमांना होणाऱ्या विरोधावरून आणि परवानग्यांच्या राजकारणावर बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. “कुठल्याही मंदिराच्या किंवा धार्मिक कार्यासाठी आता आम्हाला परवानगी का मागावी लागत आहे? रामाचे मालक हे लोक कधीपासून झाले? जर राम रक्षा किंवा हनुमान चालीसा म्हणण्यासाठीही प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असेल, तर मग हे स्वतःला हिंदुत्वाचे एकमेव मालक समजायला लागले आहेत का?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. उद्या आपण स्वतः नागपूर दौऱ्यावर जात असून, तिथे राम मंदिरा संदर्भातील आगामी कामाची पाहणी करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरमधील राम मंदिर न्यासाचा (ट्रस्ट) संदर्भ देत संजय राऊत म्हणाले, “त्या न्यासाचे अध्यक्ष जरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले आणि ते तिथले आजीवन सदस्य असले, तर आम्ही सर्वजण प्रभू श्रीरामाचे ‘आजीव भक्त’ आहोत. ते केवळ एका संस्थेचे सदस्य आहेत, पण आमचे नाते रामाशी भक्तीचे आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही वाद निर्माण होईल असे मला वाटत नाही. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरे आणि धार्मिक संस्था आहेत.”

पुढे बोलताना राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना या आंदोलनात सहभागी होण्याचे थेट आव्हान दिले. “देशात प्रभू श्रीरामाच्या नावावर नेमके काय राजकारण सुरू आहे, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हाच आमचा मुख्य हेतू आहे. खरं तर आमच्या या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे पाठिंबा दिला पाहिजे. फडणवीस स्वतः सांगतात की ते राम मंदिराच्या कारसेवेला गेले होते. मग ज्या राम मंदिराच्या कारसेवेसाठी ते गेले होते, तेच मंदिर जर आज लुटले जात असेल, तर फडणवीसांसह त्यांनी निर्माण केलेल्या मंदिरातील सर्व पुजारी आणि भक्तांनी आमच्या आंदोलनात उतरायला हवे. मी देवेंद्र फडणवीसांना खुले निमंत्रण देतो, त्यांनी स्वतः आमच्या ‘राम रक्षा’ आंदोलनात सहभागी व्हावे,” असे स्पष्ट आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ