“गेल्या ३ वर्षांपासून ती सोबत राहत नाही, घटस्फोटाच्या नोटीसनंतर पैशांसाठी रचला डाव”; माजी खासदार विनायक राऊत आणि मुलगा गितेश यांनी फेटाळले सर्व आरोप.
शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्या सूनेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पती गितेश राऊत याच्याकडून शारीरिक संबंधांना नकार दिला जाणे, कौटुंबिक छळ आणि घरात अघोरी कृत्य व जादूटोणा केला गेल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यासह ७ जणांवर (ज्यात दोन बाबांचाही समावेश आहे) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर अखेर माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना विनायक राऊत यांनी कुटुंबावरील सर्व आरोप निखालस खोटे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “लग्नानंतर गितेश आणि त्यांची पत्नी गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहतच नाहीत. गिरीजाने आपल्या तक्रारीत २०१८ ते २०२२ या काळात अघोरी कृत्य केले गेल्याचा दावा केला आहे. जर हे सर्व प्रकार घडत होते आणि त्यावेळी तिचे आई-वडीलही तिच्यासोबत होते, तर मग तिने त्याच वेळी पोलिसांत तक्रार का केली नाही? आज २०२६ मध्ये, म्हणजेच तब्बल चार वर्षांनंतर ही तक्रार केली जात आहे, यावरूनच यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचे स्पष्ट होते.” आई-वडिलांच्या संरक्षणात असताना अघोरी प्रकारांवर गप्प राहून आता इतक्या वर्षांनी आरोप करणे संशयास्पद असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
या वादामागे पैशांची आणि मालमत्तेची मागणी कारणीभूत असल्याचा थेट आरोप विनायक राऊत यांनी केला. “गेल्या महिन्यात आम्ही घटस्फोटाची (डिव्होर्स) याचिका दाखल केली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांची तडजोडीसाठी बैठक झाली होती. या बैठकीत गिरीजाच्या बाजूने ३ BHK फ्लॅट, टेरेस फ्लॅट, ५ कोटी रुपये आणि एक इलेक्ट्रिक कार मागण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यानेच आता कौटुंबिक हिंसाचार आणि जादूटोण्याचा खोटा आधार घेत ही नोटीस आणि तक्रार देण्यात आली आहे,” असे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. कायदेशीर प्रक्रियेत दबाव आणण्यासाठीच हे पूर्वनियोजित कारस्थान रचले गेले असल्याचे सांगत राऊत यांनी सूनेचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत.




