Eknath Khadse Had Arrived To Meet Uddhav Thackeray  : तावडेंच्या भेटीनंतर खडसे थेट ‘मातोश्री’वर!

spot_img

राजकीय चर्चांना उधाण आलं खरं, पण ‘नाथाभाऊंनी’ सांगितलं भेटीमागचं ‘अमृत’ गुपित

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती. या भेटीच्या फोटोंनी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करणार का? अशा चर्चांना प्रचंड उधाण आलेलं असतानाच, नाथाभाऊंनी आता थेट शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली.

या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना एक वेगळंच वळण मिळालं आहे. विशेष म्हणजे या बैठकीला खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. एकनाथ खडसे यांनी वर्षानुवर्षे भाजपमध्ये काम केलं, पण नंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या त्यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या कोट्यातून केंद्रात मंत्री आहेत. अशा परिस्थितीत आधी विनोद तावडे आणि आता थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय खिचडी नक्की काय शिजतेय, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

परंतु, या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केलं की “पुढील महिन्यात माझा अमृत महोत्सवी (७५ वा) वाढदिवस आहे. माझे कार्यकर्ते आणि समर्थक हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत. याच सुवर्णक्षणाचं आग्रहाचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी मी मातोश्रीवर आलो होतो. या भेटीचा आणि राजकारणाचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही.”

काही काळापूर्वी एकनाथ खडसे यांचं कुटुंब वेगळ्याच कारणाने प्रचंड चर्चेत आलं होतं. त्यांचे जावई प्रांजल खेवलकर हे पुण्यातील एका कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अडचणीत सापडले होते. पोलिसांनी त्या पार्टीवर धाड टाकली असता, बुकिंग एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं.

या कठीण प्रसंगात एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी माध्यमांसमोर येत विरोधकांचे दावे फेटाळले आणि थेट न्यायालयात कायदेशीर लढा दिला. या संकटकाळात संपूर्ण खडसे कुटुंब एकत्र आणि खंबीरपणे उभं असल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, कौटुंबिक वादळानंतर आता नाथाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची एकत्र येण्याची लगबग सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ