Sudhir Mungantiwar : सावरकरांना इंग्रजांनी छळलं, तुम्ही तर छळू नका! मुनगंटीवारांचा विधानसभेत आपल्याच सरकारवर ऐतिहासिक भडका!

spot_img

सभागृहात भाजप नेत्याचा उद्वेग; ‘आपलं सरकार फाईल दाबून ठेवतंय हे योग्य नाही’, तर दुसरीकडे राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची पिसे काढली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात तापला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडत आपल्याच सरकारचे कान टोचले. सावरकरांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा ठराव अद्यापही सभागृहात न आणल्याबद्दल त्यांनी थेट भाजप-महायुती सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मंत्री जयकुमार रावल यांना धारेवर धरले.

मुनगंटीवार संताप व्यक्त करत म्हणाले, “भाजपच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचे वचन देण्यात आले होते. परंतु, सत्ता आल्यावर अशा गोष्टी विसरणे योग्य नाही. सावरकरांना इंग्रजांनी अतोनात यातना दिल्या, आता आपण त्यांची फाईल दाबून ठेवून त्यांचा अवमान करू नये. ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सावरकरांच्या विचारांवर जगलो, तेच आमचे सरकार आता फाईल दाबून ठेवत असेल तर हा मोठा उद्वेग आहे.” यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत, हा प्रस्ताव पुढील अधिवेशनात सविस्तर चर्चेसाठी आणला जाईल, असे सांगून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित देणगी/चोरीच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे घेरले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या संवेदनशील विषयावरून सरकारची अक्षरशः पिसे काढली. लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या मंदिरात अशी सुरक्षा चूक किंवा गैरव्यवहार कसा होतो, असा सवाल करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या गदारोळात सुधीर मुनगंटीवार यांनीही या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर आपली परखड भूमिका मांडली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ