गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महिनाभर चाललेल्या जागतिक उत्सवाचा सांगता सोहळा; ६०० हून अधिक जागतिक मान्यवरांची उपस्थिती
बेंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ इंटरनॅशनल सेंटरमध्ये संस्थेच्या मानवीय सेवेची ४५ वर्षे आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महिनाभर चाललेल्या जागतिक उत्सवाचा भव्य सांगता सोहळा संपन्न झाला. भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात ६०० हून अधिक जागतिक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ४५ वर्षांच्या अद्वितीय प्रवासाचे प्रतीक असलेल्या विशेष ‘स्मारक टपाल तिकिटाचे’ (Commemorative Postage Stamp) अनावरण करण्यात आले. तसेच देशापुढील आधुनिक आव्हानांना उत्तर देण्यासाठी आणि मानवी विकासाला गती देण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमांचा शानदार शुभारंभ करण्यात आला. यामध्ये तरुणांना नागरी सेवा आणि हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण देणारा ‘यूथ करिअर एक्सलन्स प्रोग्राम’, पूर्वेकडील समृद्ध ज्ञानपरंपरा आधुनिक शिक्षणाशी जोडणारा ‘फॅकल्टी ऑफ ईस्टर्न नॉलेज सिस्टिम्स’, ५०० नवोन्मेषी स्टार्टअप्सना सक्षम करणारे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप इन्क्युबेशन’, मानसिक आरोग्य आणि मानवी क्षमतेवर संशोधन करणारे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॉन्शियसनेस स्टडीज’, आणि २०३० पर्यंत दरवर्षी किमान १ लाख टन प्लास्टिक वापरात घट करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवणारा पर्यावरणपूरक ‘इको शांती’ या प्रकल्पांचा समावेश आहे.
या सोहळ्यात बोलताना उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुदेवांच्या जागतिक चळवळीचा गौरव केला आणि “संघर्षाने वेढलेल्या या जगात गुरुदेव श्री श्री रविशंकर हे विवेक आणि शांततेचे दूत आहेत,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. उपराष्ट्रपतींचे स्वागत करताना गुरुदेवांनी “ध्यान ही आता चैनीची गोष्ट राहिलेली नसून निरोगी व तणावमुक्त जीवनासाठी ती एक आवश्यक बाब बनली आहे,” असे प्रतिपादन केले, तसेच भय आणि द्वेषमुक्त ‘वसुधैव कुटुंबकम्’चे स्वप्न पाहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनीही आपले विचार मांडले. आपल्या आश्रम भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, मंदिरांमध्ये दर्शन घेतले, गोशाळेला भेट दिली आणि ‘इंट्यूशन प्रोग्राम’मधील लहान मुलांच्या सहज ज्ञान क्षमतेची थक्क करणारी प्रात्यक्षिके पाहिली. महिनाभर चाललेल्या या जागतिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती मुकेश अंबानी व अनंत अंबानी, आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह देश-विदेशातील ६७८ दिग्गज नेते, उद्योजक, कलाकार व आध्यात्मिक गुरू उपस्थित होते, ज्यामुळे हा संपूर्ण उत्सव गुरुदेवांच्या तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाजाच्या दृष्टीकोनाचे जिवंत प्रतिबिंब ठरला.




