मेलबर्नमधील ‘सीईओ फोरम’मध्ये पंतप्रधान मोदींचा जागतिक उद्योजकांना भारताच्या विकासयात्रेत सहभागी होण्याचा थेट मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वेकडील देशांच्या दौऱ्याने आता आंतरराष्ट्रीय आर्थिक वर्तुळात एक मोठी आणि ऐतिहासिक भरारी घेतली आहे. इंडोनेशियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींचे तिथे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेवर आणि प्रगतीवर पुन्हा एकदा जागतिक शिक्कामोर्तब झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध ‘ऑस्ट्रेलियन सुपर’ (Australian Super) या संस्थेने भारताच्या ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड’मध्ये (NIIF) तब्बल ५०० दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे ४,२०० कोटी रुपये) इतकी अतिरिक्त गुंतवणूक करण्याची मोठी घोषणा केली आहे. या भरीव निधीमुळे भारतातील पायाभूत सुविधा, ऊर्जा, वाहतूक आणि मोठ्या विकास प्रकल्पांना प्रचंड गती मिळणार आहे.
मेलबर्न येथे गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या ‘सीईओ फोरम’मध्ये (CEO Forum) दोन्ही पंतप्रधानांनी भारत आणि ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य उद्योगपती व व्यावसायिक दिग्गजांशी थेट संवाद साधला. या मंचावरून पंतप्रधान मोदींनी भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा पाढा वाचत, ऑस्ट्रेलियाला भारताच्या विकासयात्रेत सक्रिय आणि दीर्घकालीन भागीदार होण्याचे जाहीर आवाहन केले.
जागतिक स्तरावरील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले “आज संपूर्ण जग अनिश्चितता, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी (Supply Chain) आणि तीव्र ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. अशा आव्हानात्मक काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांचे नैसर्गिक आणि अत्यंत विश्वासार्ह भागीदार म्हणून एकत्र उभे राहणे काळाची गरज आहे.”
या परिषदेत २०२२ मध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या ‘इकोनॉमिक कॉर्पोरेशन आणि ट्रेड ॲग्रीमेंट’चा (ECTA) प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. हा ऐतिहासिक व्यापार करार लागू झाल्यापासून भारताची ऑस्ट्रेलियातील निर्यात थेट दुप्पट झाली असून, दोन्ही देशांतील उद्योजकांना एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये मोठी संधी मिळाली आहे.
सध्या भारतात जलविद्युत प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या पर्यावरणपूरक क्षेत्रांसाठी एक मजबूत इकोसिस्टिम (Ecosystem) तयार केली जात आहे. यात जागतिक पातळीवरील अनेक बड्या कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाकडे असलेले प्रगत तंत्रज्ञान, अथांग भांडवल आणि नैसर्गिक संसाधने यांचा भारताच्या या ऊर्जेच्या प्रवासाला मोठा फायदा होऊ शकतो आणि हाच समन्वय दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.




