Accident News : काळजाचा थरकाप! अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर एसटी आणि दुचाकीची भीषण धडक; जुन्नरमधील ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

spot_img

डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; विठ्ठलवाडी-पाथर्डी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

ओतूर,प्रतिनिधी:दि.२५ मे [ रमेश तांबे ]

अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (२४ मे) रात्री साडेआठच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. डिंगोरे गावाच्या हद्दीत विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बसने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील चारही तरुण मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे डिंगोरे परिसरासह संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अपघातातील मृत तरुणांची नावे:

  • आशिष ढवळू भले (वय २४, रा. मराडवाडी, डिंगोरे)
  • दीपक सखाराम भले (वय २८, रा. मराडवाडी, डिंगोरे)
  • शिवराम नारायण पारधी (वय २६, रा. आंबेदरा, डिंगोरे)
  • खंडू नारायण भले (वय २५, रा. आंबेदरा, डिंगोरे)

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी डेपोची ‘कल्याण ते पाथर्डी’ धावणारी एसटी बस (क्र. MH 20 BL 2983) कल्याणकडून ओतूरच्या दिशेने जात होती. याच वेळी ओतूरहून डिंगोरे गावाकडे चौघे तरुण एकाच ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ दुचाकीवरून (क्र. MH 14 MA 7849) चालले होते. महामार्गावरील ‘जीवनदीप हॉटेल’ जवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील चारही जण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेले.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन तरुणांना तातडीने ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तर एकाला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच चारही तरुणांना मृत घोषित केले.

या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी डिंगोरे येथील स्थानिक रहिवासी विठ्तल यशवंत भले यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एसटी बस चालक नागेश बबन गुरव (वय ३५, रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ