Pune Bishnoi Gang Firing : मुंबईनंतर आता पुण्यातही बिश्नोई गँगची दहशत; पिंपरी चिंचवडमध्ये फर्निचर मॉलवर धडाधड गोळ्या

spot_img

‘हा फक्त ट्रेलर आहे…’; शुभम लोणकरच्या शूटर्सनी चालवल्या ६ गोळ्या, आरजू बिश्नोईच्या नावाने कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले असून, कोयता गँगच्या हैदोसानंतर आता थेट कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगची एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या बिश्नोई गँगच्या दोन शार्प शूटर्सनी ‘एजे’ (AJ) फर्निचर मॉलच्या दिशेने अचानक अंदाधुंद गोळीबार केला. रात्री ९:२० च्या सुमारास झालेल्या या थरारक घटनेत दोन वेगवेगळ्या पिस्तुलांतून ५ ते ६ राऊंड फायर करण्यात आले. सुदैवाने, गोळीबाराच्या वेळी घटनास्थळी कोणीही हजर नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी मॉलमधील काचा फुटल्या असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या गोळीबारानंतर बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकर याच्या शूटरने सोशल मीडियाच्या माध्यमातून मॉलचे मालक अशोक नैन यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मॉल मालकाचा संबंध ‘एमडी ड्रग्स’ तस्कराशी जोडत, “हा केवळ ट्रेलर होता, यापुढे थेट डोक्यात गोळी मारली जाईल,” असा थेट इशारा या गँगकडून देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, या गोळीबाराची अधिकृत जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई याने घेतल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात “जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आणि आमची लवकरच भेट होईल,” अशी खुली धमकी देण्यात आली आहे. (टीव्ही ९ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही). पोलीस सध्या या ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी करत असून, बिश्नोई गँगच्या पुण्यातील वाढत्या नेटवर्कचा छडा लावण्यासाठी कसून तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ