Export Data : जागतिक युद्धाच्या सावटात भारताचा ‘प्लॅन बी’ यशस्वी; इंधन दरवाढीच्या धक्क्यामध्येही निर्यातीचा नवा विक्रम!

spot_img

पंतप्रधानांचे देशवासियांना तेल आणि सोने जपून वापरण्याचे आवाहन; हॉर्मुज नाकाबंदीमुळे महागाई वाढली, तरीही एप्रिल महिन्यात निर्यातीत १३.७८ टक्क्यांची मोठी झेप

अमेरिका आणि इराणमधील युद्ध सध्यातरी थांबले असले, तरी त्यावरील तणाव अद्याप निवळलेला नाही. ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मध्ये दोन्ही देशांनी केलेल्या नाकाबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड भडकल्या आहेत. ही अनिश्चितता कधी संपणार याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. याच पार्श्वभूमीवर, देशाच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करण्याचे आणि वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. सोने खरेदीसाठी डॉलरमध्ये पेमेंट करावे लागत असल्याने रुपयाचे मूल्य घसरत आहे. या जागतिक संकटामुळे केंद्र सरकारला अखेर तब्बल चार वर्षांनंतर देशात प्रतिलिटर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ करावी लागली आहे. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भावही कडाडले असून महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे.

इंधनाच्या या भडक्यामुळे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्यातील आयात-निर्यातीची ताजी आकडेवारी याचे उत्तम उदाहरण आहे. जागतिक स्तरावर अनेक आव्हाने आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘टॅरिफ हल्ला’ असूनही एप्रिल महिन्यात भारताची निर्यात १३.७८ टक्क्यांनी वाढून ४३.५६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर एकूण निर्यातीचा (वस्तू आणि सेवा) आकडा ८०.८० अब्ज डॉलरवर गेला आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच काळात वार्षिक आधारावर देशाची आयातही १० टक्क्यांनी वाढून ७१.९४ अब्ज डॉलर झाली आहे. परिणामी, भारताला एप्रिल महिन्यात २८.३८ अब्ज डॉलरचा व्यापारी तोटा सहन करावा लागला आहे.

या संकटकाळात भारताच्या अनेक क्षेत्रांनी निर्यातीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यामध्ये धान्याच्या निर्यातीत सर्वाधिक २१०.१९ टक्के, तर मांस, डेअरी व पोल्ट्री उत्पादनांत ४८.०३ टक्के आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ४०.३१ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय औषधे, इंजिनिअरिंग वस्तू आणि कॉफीच्या निर्यातीतही सुधारणा झाली आहे. मात्र, हॉर्मुज संकटामुळे पश्चिम आशियाई देशांना होणाऱ्या भारताच्या निर्यातीत २८ टक्के घट झाली असून ती ४.१६ अब्ज डॉलरवर आली आहे (जी गेल्या वर्षी ५.७८ अब्ज डॉलर होती). तसेच तिथून होणारी आयातही ३१.६४ टक्क्यांनी घटली आहे. पश्चिम आशियातील घसरणीनंतरही भारताने इतर जागतिक बाजारपेठा काबीज केल्याने मोदी सरकारचा ‘प्लॅन बी’ पूर्णपणे यशस्वी ठरत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ