Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून दुर्दैवी घटना; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी

spot_img

मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना चेंबूर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. चेंबूरमधील 11 नंबर रोड परिसरात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसवर अचानक एक मोठे आणि जुने झाड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, सुमारे दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, घटनेनंतर काही काळ एका विद्यार्थ्याचा बसमध्ये अडकल्याची माहिती मिळाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, शाळेची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून बसवर कोसळले. झाडाच्या जड फांद्या बसच्या छतावर आदळल्याने बसच्या पुढील आणि मध्यभागाचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना आणि चालकाला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी या परिसरातील धोकादायक झाडांबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने योग्य वेळी कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ