Sharad Pawar Tweet To PM Narendra Modi : “जनतेत अस्वस्थता, तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा!” मोदींच्या ‘काटकसरी’च्या सल्ल्यावर शरद पवारांचे मोठे आव्हान

spot_img

पंतप्रधानांच्या घोषणेमुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; शरद पवारांनी ‘एक्स’वरून सुनावले खडे बोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचत, खाद्यतेलाचा कमी वापर आणि सोने-चांदीची खरेदी टाळण्याचे जे आवाहन केले, त्यावर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मुद्द्यावर थेट भूमिका मांडली आहे. पवारांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून ट्वीट करत पंतप्रधानांना महत्त्वाचे आवाहन केले असून, सध्याच्या निर्णयांवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शरद पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक केल्या गेल्यामुळे सामान्य नागरिक, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही बाब देशाच्या स्थैर्यासाठी निश्चितच काळजी वाढवणारी आहे.” पवारांनी या माध्यमातून सुचवले आहे की, अशा मोठ्या निर्णयांपूर्वी व्यापक चर्चा होणे आवश्यक होते.

या विषयाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी आणि सर्व नेत्यांना विश्वासात घ्यावे.केवळ राजकीय नेत्यांशीच नव्हे, तर देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात यावा. सध्याच्या काळात लोकांमध्ये भीतीचे वातावरण नसून विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.

पाच राज्यांच्या निवडणुका संपताच मोदींनी केलेल्या या ‘काटकसरी’च्या आवाहनामुळे सर्वसामान्यांचे धाबे दणाणले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार का? की देश पुन्हा एखाद्या आर्थिक संकटाकडे जात आहे? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच पवारांच्या या भूमिकेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती हाताळताना सरकारने अधिक संवेदनशील राहून सल्लामसलत करावी, असा मोलाचा सल्लाही पवारांनी यावेळी दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ