NEET Exam : नीट पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; लातूरमध्ये CBI तपास अधिक तीव्र

spot_img

देशभरात चर्चेत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक गंभीर टप्प्यात पोहोचला असून लातूर हे या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या आठ दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडत विविध संशयितांची कसून चौकशी सुरू ठेवली आहे. या तपासादरम्यान आता प्राध्यापिका मनीषा हवालदार यांचे नाव समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

माहितीनुसार, मनीषा हवालदार या फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका असून त्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी (NTA) पेपर सेटर म्हणूनही संबंधित होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत तपास यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याआधी मनीषा मंधारे हिच्यावर बायोलॉजीचा पेपर लीक केल्याचा आरोप झाला होता, तर प्रल्हाद कुलकर्णी याचा कॅमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकेशी संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली होती. आता फिजिक्स विषयाचाही या रॅकेटशी संबंध जोडला गेल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे.

CBI ने आतापर्यंत लातूरमधील चार नामांकित डॉक्टरांची चौकशी केली असून काही महत्त्वाचे पुरावेही हाती लागल्याची चर्चा आहे. याआधी अनेक प्राध्यापकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रासोबत वैद्यकीय क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे पालकांमध्येही चिंता वाढली आहे.

दरम्यान, तपास पुढे सरकत असताना आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. CBI विविध आर्थिक व्यवहार, संपर्क आणि डिजिटल पुराव्यांची छाननी करत असून पेपरफुटीचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ