गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेनंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणात सुखद गारवा निर्माण केला आहे. मुंबई, कोकण, सोलापूर आणि इतर अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून येत्या तीन दिवसांत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. राजापूर, लांजा आणि संगमेश्वर भागात मुसळधार सरी बरसल्या. विशेषतः लांजा तालुक्यातील सापुचेतळे आणि खानवली परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना शेतीपूर्व कामांसाठी अनुकूल परिस्थिती मिळाली आहे.
मात्र, या अवकाळी पावसामुळे हापूस आंबा उत्पादकांना मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा पिकाचे नुकसान झाल्याने बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर अशाच प्रकारच्या पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




