MHT CET Scam : NEET नंतर आता MHT-CET वर घोटाळ्याचे सावट; विरोधकांच्या आरोपांवर CET सेलचे प्रत्युत्तर

spot_img

एनईटीच्या वादळानंतर एमएचटी-सीईटी परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचा विरोधकांचा गंभीर दावा; सीईटी सेलकडून मात्र सर्व आरोप फेटाळत सायबर पोलिसांत तक्रार दाखल

देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाचे पडसाद अद्याप पूर्णपणे शांत होत नाहीत तोच, आता महाराष्ट्रात एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेच्या निकालावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. नीट परीक्षेच्या धर्तीवर सीईटी परीक्षेतही मोठा फेरफार आणि महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महादेव बालगुडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर या प्रकरणाने अधिकच जोर धरला आहे. या व्हिडिओमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये जेमतेम गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत थेट ९९ किंवा १०० पर्सेंटाइल कसे काय मिळू शकतात, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याआधी काँग्रेस नेते सचिन सावंत आणि इतर विरोधकांनीही याप्रकरणी ताशेरे ओढत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.

दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या या गंभीर आणि सनसनाटी आरोपांवर अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सेलने आपले मौन सोडले आहे. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आणि कोणत्याही पुराव्याविना असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन वेगवेगळ्या परीक्षांच्या पद्धतींची तुलना करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी ‘टक्केवारी’ (Percentage) आणि ‘पर्सेंटाइल’ (Percentile) या दोन्ही पूर्णपणे भिन्न संकल्पना असल्याचे समजावून सांगितले. एखाद्या बॅचमधील गुणवत्तेनुसार ठरणाऱ्या पर्सेंटाइल पद्धतीचे गणित वेगळे असते, त्यामुळे बोर्डाच्या गुणांवरून सीईटीच्या निकालावर शंका घेणे अन्यायकारक आहे, असे सरदेसाई यांनी नमूद केले. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची दखल घेऊन अंतर्गत स्तरावर सखोल विश्लेषण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दिशाभूल करणाऱ्या व खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सीईटी सेलने आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि महाराष्ट्र सायबर विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ