Japan Open 2026 : बॅडमिंटन कोर्टवर सिंधूचा धमाका! चिनी भिंत भेदत पहिल्यांदाच गाठली ‘जपान ओपन’ची फायनल

spot_img

ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईचा केला पराभव; सलग ५ पराभवांची मालिका मोडीत काढत रचला इतिहास

भारताची स्टार शटलर आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शनिवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात ३१ वर्षीय सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करत ‘जपान ओपन २०२६’ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत (फायनल) धडक मारली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची फायनल गाठणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चीनच्या बलाढ्य चेन युफेईचा पराभव केला आणि त्याचसोबत युफेईविरुद्धच्या सलग ५ पराभवांचा कटू इतिहासही पुसून टाकला.

या महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आघाडी टिकवून ठेवण्याची सिंधूची रणनीती स्पष्ट होती. मात्र, खेळाची सुरुवात चिनी खेळाडूने आघाडी घेत केल्यामुळे सिंधूवर दबाव होता. तरीही हार न मानता सिंधूने जोरदार पुनरागमन केले आणि पहिल्या गेमच्या मध्यापर्यंत चार गुणांची भक्कम लीड घेतली. यानंतर माजी ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईने आपले कसब पणाला लावत गुणसंख्या १९-१९ अशी बरोबरीवर आणली. या तणावाच्या क्षणी दोघांमध्ये तब्बल ५१ शॉट्सची एक थरारक रॅली झाली, ज्यामध्ये सिंधूने बाजी मारली. अत्यंत संयम राखत पहिल्याच ‘गेम पॉइंट’चा फायदा उठवून सिंधूने पहिला गेम २१-१९ असा नावावर केला.

दुसऱ्या गेममध्ये तर सिंधूने कोर्टवर पूर्णपणे आपले वर्चस्व गाजवले. तिने अचूक ड्रॉप शॉट्स खेळत चेन युफेईला चांगलेच दमवले आणि १५-१० अशी मजबूत आघाडी मिळवली. मात्र, याच दरम्यान चिनी खेळाडूच्या पायाची हॅमस्ट्रिंग (स्नायूंची) दुखापत बळावली आणि वेदनेमुळे तिला हा सामना अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली. परिणामी, रेफ्रींनी सिंधूला विजयी घोषित करत फायनलचे तिकीट बहाल केले.

सिंधूने तब्बल दोन वर्षांनंतर एखाद्या बीडब्ल्यूएफ (BWF) टूरच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी २०२४ मध्ये तिने ‘सैयद मोदी इंटरनॅशनल’चे विजेतेपद मिळवले होते. या वर्षाच्या सुरुवातीला खराब फॉर्ममुळे तिचे जागतिक मानांकन १८ व्या स्थानापर्यंत खाली घसरले होते, परंतु आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत तिने पुन्हा अव्वल १० मध्ये पुनरागमन केले असून सध्या ती जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानावर पोहोचली आहे. रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात (फायनल) सिंधूचा सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलच्या विजेत्याशी होईल. सिंधूची ही फॉर्मात आलेली लय पाहता, ती रविवारी देशासाठी या वर्षातील पहिले ‘सुपर ७५०’ विजेतेपद नक्कीच पटकावेल, अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ