Inspector Manju : ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेत डॅशिंग खलनायिका ‘DYSP पूर्वा पाटील’ची एन्ट्री; सत्या-मंजूच्या आयुष्यात येणार मोठं वादळ

spot_img

अभिनेत्री पूर्वा शिंदे खाकी वर्दीत साकारणार तात्यासाहेबांच्या मुलीची भूमिका; सत्याचा बदला घेण्यासाठी आखणार नवे डावपेच

‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘इन्स्पेक्टर मंजू’ सध्या नवनवीन ट्विस्ट आणि रंजक वळणांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नुकतीच आर्यनची एन्ट्री झाली होती, ज्याने सत्या आणि मंजूमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मोठा डाव आखला होता. मंजूसोबत लग्न करण्याचा त्याचा प्लॅन मंजूने अगदी धाडसाने उधळून लावला आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. मंजूच्या या रणरागिणी रूपाने प्रेक्षकांची मने जिंकली असतानाच, आता मालिकेत आणखी एक मोठे आणि धक्कादायक वळण आले आहे. मालिकेत आता ‘इन्स्पेक्टर मंजू’ची हेड पोलीस अधिकारी म्हणजेच ‘DYSP पूर्वा पाटील’ची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

विशेष म्हणजे ही पूर्वा पाटील दुसरी तिसरी कोणी नसून थेट तात्यासाहेबांची मुलगी आहे, जी सत्याचा बदला घेण्यासाठी परतली आहे. मालिकेत या डॅशिंग खलनायिकेच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा शिंदे पाहायला मिळत आहे. पूर्वाच्या या येण्याने आता सत्या आणि मंजूच्या नात्यात कोणती नवीन उलथापालथ होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ही मालिका दररोज रात्री ८ वाजता ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येते.

या अत्यंत आव्हानात्मक आणि नव्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री पूर्वा शिंदे कमालीची उत्सुक दिसली. ती म्हणाली, ”माझ्या खऱ्या आयुष्यातील नाव आणि स्क्रीनवरील भूमिकेचे नाव (पूर्वा) एकच असणे हा फार दुर्मिळ योग आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. नाव सारखे असले तरी खऱ्या आयुष्यात मी खूप वेगळी आहे. मालिकेत मी ‘DYSP पूर्वा पाटील’ हे पात्र साकारत आहे. तात्यासाहेबांची मुलगी असल्याने सत्या आणि मंजूला धडा शिकवणे हाच तिचा मुख्य हेतू आहे. ती स्वतः पोलीस अधिकारी असल्याने कायद्याचे सगळे धागेदोरे तिच्या हातात आहेत. जेव्हा मला या भूमिकेची ऑफर आली, तेव्हा मी लगेच होकार दिला; कारण पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात खलनायिका साकारण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे.”

आपला अनुभव सांगताना पूर्वा पुढे म्हणाली की, ”मी पहिल्यांदा जेव्हा पोलिसांची खाकी वर्दी अंगावर चढवली, अगदी त्याच क्षणापासून माझ्यात एक वेगळाच रुबाब, शिस्त आणि जबाबदारीची भावना आली. त्या गणवेशात खरंच एक वेगळीच जादू आहे. मी कॉलेजमध्ये असताना NCC कॅडेट असल्याने मला वर्दीबद्दल आधीपासूनच प्रचंड आदर आणि आकर्षण होते, त्यामुळे हे पात्र जगताना मला खूप मजा येत आहे. आता ‘DYSP पूर्वा’ सत्या आणि मंजिरीच्या आयुष्यात नवे वादळ घेऊन आली आहे. यापूर्वी मी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांवर प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे, जी माझ्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा माझ्यावर भरपूर राग काढण्यासाठी प्रेक्षक म्हणून तुम्ही तयार राहा!”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ