Rishabh Pant : भारताच्या वनडे संघातून सुट्टी, उपकर्णधारपदही गेले आणि आता थेट लाईव्ह मुलाखतीत दिली शिवी

spot_img

लखनऊ सुपर जायंट्सचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव; इयान बिशप यांच्याशी बोलताना पंतचा जिभेवरील ताबा सुटला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर BCCI कडक कारवाई करण्याची शक्यता

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याचे ग्रह सध्या फिरले आहेत. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही त्याचे वाईट दिवस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याला आपली छाप पाडता आलेली नाही आणि त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाची कामगिरी अत्यंत खराब होत आहे. या खराब फॉर्ममुळे त्याला आधीच भारताच्या वनडे संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर कसोटी संघातूनही त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. आयुष्यात एवढा मोठा मानसिक मनस्ताप सुरू असतानाच, आता त्याच्याकडून आणखी एक मोठी चूक झाली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर एका लाईव्ह मुलाखतीदरम्यान ऋषभ पंतचा जिभेवरील ताबा सुटला आणि त्याने थेट शिवीगाळ केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याला प्रचंड सुनावत आहेत.

राजस्थानविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर ऋषभ पंत कॅमेऱ्यासमोर प्रसिद्ध समालोचक इयान बिशप यांच्याशी चर्चा करण्यासाठी आला होता. पराभवाचे विश्लेषण करताना पंत म्हणाला, “मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. आम्ही धावफलकावर अजून १० धावा अधिक बनवू शकलो असतो, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. जयपूरची विकेट फलंदाजीसाठी खूप चांगली होती, त्यामुळे इथे गोलंदाजी करणे कठीण होते. अशा खेळपट्टीवर अनुभवाची गरज असते, जी आमच्याकडे कमी पडली. जर तुमच्याकडे अनुभव असेल, तर कठीण प्रसंगात तुम्ही चांगले प्रदर्शन करू शकता. मला माझ्या संघाचा अभिमान आहे, पण हे सुद्धा तितकेच सत्य आहे की समोरची ‘XXX’ (शिवी) चांगली टीम आहे.”

लाईव्ह टीव्हीवर अशा प्रकारे जाहीरपणे अपशब्दांचा वापर केल्यामुळे ऋषभ पंतवर बीसीसीआय (BCCI) कडून आचारसंहितेच्या भंगाचा ठपका ठेवत मोठी दंडात्मक किंवा निलंबनाची कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सामन्यात लखनऊच्या गोलंदाजांवर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने मैदानावर तुफान फलंदाजी केली. या डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये १० षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने तब्बल ९३ धावांची धुवांधार खेळी केली. त्याला साथ देत ध्रुव जुरेलने नाबाद ५३ धावा ठोकल्या, तर कर्णधार यशस्वी जयस्वालने २३ चेंडूत ४३ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून मिचेल मार्शने जबरदस्त फलंदाजी करत ५७ चेंडूत ९६ धावा कुटल्या होत्या. जोश इंग्लिसने २९ चेंडूत ६० धावा आणि कर्णधार ऋषभ पंतने ३५ धावा केल्या होत्या. लखनऊने विजयासाठी दिलेले २२१ धावांचे विशाळ आव्हान राजस्थान रॉयल्सने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अगदी सहज पार केले आणि लखनऊला पराभवाचा धक्का दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ